सारथी महाराष्ट्राचा
शिरूर तालुका प्रतिनिधी:



संतोष देशमुख हत्या प्रकरणात पद्धतशीरपणे सरकारचा छूपा अजेंडा राबविला गेला, सरकारचे प्रतिनिधी या मॅटरमध्ये इन्व्हॉल्व झाले आणि एक राजकीय गुंड मित्र त्यांनी बरोबर पद्धतशीरपणे, शांत डोक्याने बाहेर काढला. त्यामुळे सरकारनेच या गंभीर विषयाची विल्हेवाट लावल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज येथे केला. मंत्री धनंजय मुंडे यांनीच गुंड, गुन्हेगारांच्या टोळ्या पोसल्या अन्यथा बीड जिल्ह्यात संघटीत गुन्हेगारीचे चित्र दिसलेच नसते, असेही ते म्हणाले. अहिल्यानगर कडे जाताना जरांगे पाटील यांनी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना संतोष देशमुख हत्या प्रकरण सरकारने गांभीर्याने हाताळले नसल्याचा आरोप केला. ते म्हणाले, देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात तपास यंत्रणेला सरकारकडून शंभर टक्के मुभा मिळाली नाही. आरोपींना पळून जाण्यासाठी पैसे, गाड्या पुरविणारे, त्यांना आश्रय देणारे, त्यांचा बचाव करणारे पोलिस याबाबत पुरावे देऊनही दखल घेतली गेली नाही. अन्यथा आणखी शंभर ते दीडशेजण या प्रकरणात सहआरोपी झाले असते. आणि तसे झाले असते तर सरकारची बदनामी झाली असती. म्हणून त्यांनी घाईघाईने चार्जशीट दाखल केले, सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आणि आता खटल्याचे कामकाज सुरू झाले. त्यामुळे आता इतर सहआरोपी होतील की नाही ही शंका आहे. सरकार गंभीर असते, या प्रकरणाची आच त्यांना असती तर एवढ्या मोठ्या प्रकरणाचा त्यांनी जलद गतीने तपास केला असता. पण तसे झालेले नाही. आम्ही आवाज उठविल्यानंतर, देशमुख कुटूंबिय उपोषणाला बसल्यानंतर आणि मस्साजोग चे ग्रामस्थ रस्त्यावर उतरल्यानंतरच सरकारला जाग आली.
अर्धी टोळी जेलमध्ये गेली असून, उर्वरित टोळी आतमध्ये जाण्यासाठी आता आम्ही मोर्चा, मोहिम तिकडे वळविणार असल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. धनंजय मुंडे यांची टोळी उध्वस्त केल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही. त्यांनी किती शेतकऱ्यांना त्रास दिला, कुणाच्या जमीनी बळकाविल्या, कुणाच्या प्लॉटवर अतिक्रमण केले. कुठल्या मुलीला छेडले, कुणावर बलात्कार केले, कुठे चोऱ्या केल्या, किती डाके टाकले, किती खून पचविले हे सर्व पुराव्यानिशी सरकारसमोर आणणार आहे. राजकीय मित्रत्व निभावताना काही गुंड वाचविल्याचे सरकारच्या निदर्शनास आणून देणार आहे.शिरूर शहरात श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल जाधव यांनी जरांगे व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले. बाबूराव पाचंगे, रूपेश घाडगे, सागर नरवडे, महेंद्र येवले, स्वप्नील रेड्डी, अविनाश घोगरे, कैलास भोसले, अमोल चव्हाण, सूरज पाचंगे, मंगेश कवाष्टे, अविनाश जाधव, संदीप गायकवाड, रमेश दसगुडे आदी यावेळी उपस्थित होते. अहिल्यानगरकडे जाताना मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे शहरात स्वागत करण्यात आले.संतोष देशमुख हत्येनंतर संशयित आरोपी राज्यात विविध ठिकाणी फिरले. ते शिरूर तालुक्यात आले असल्याची आपल्याला माहिती नाही, पण मी ते नाकारणारही नाही. हे आश्रयदातेही पोलिसांनी शोधले पाहिजेत असे संघर्ष योद्धा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले



Discussion about this post