शैलेश मोटघरे
गोंडऊमरी/रेल्वे :
विविध खेळ खेळत मैदानावरच्या खेळात धुळीने माखणारे नाजूक हात सध्या मोबाइल गेम्स खेळण्यात गुंग आहेत. गावागावातून शाळा सुटल्यावर किंवा शाळांना सुट्टी पडली की, खेळांच्या मैदानात मुलांची गर्दी दिसायची.एस.टी., जीप, टेम्पो यासह रेल्वेत बसून मामाच्या गावासह नातेवाईकाकडे मुले फिरायला जायची. पण अलीकडे काही वर्षांत हे चित्रच पालटून गेले आहे. सध्या इंटरनेट व मोबाइलमुळे मुलांचे बालपणच हरवले आहे. तसेच मुलांना पारंपरिक खेळांचा देखील विसर पडू लागला आहे.
पूर्वी मुले घरात कमी व घराबाहेर जास्त दिसायची. जोपर्यंत आई किंवा बाबाची हाक कानावर येत नाही तोपर्यंत घरी कोणी जात नसत,एवढे खेळण्यात मग्न असायचे. आता बाहेर किंवा मैदानात मुले कमी दिसतात आणि मोबाइल फोनवर जास्त दिसतात. विज्ञान तंत्रज्ञानाच्या राक्षसाने मुलांचे कोवळे बालपणच खाऊन टाकले आहे. लहान बाळापासून ते शाळा, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांकडून मोबाइलचा अतिवापर ही मोठी जटील समस्या बनली आहे.
लॉकडाउनच्या काळात शिक्षणासाठी मोबाइलची गरज होती. सध्या इंटरनेटच्या जगात मुलांनी स्मार्ट अभ्यास करावा म्हणून शालेय पाठ्यपुस्तक इंटरनेटवर उपलब्ध करून दिली तसेच अनेक इतर वाचनीय ई-पुस्तकेही आपणास मोबाइल, कॉम्प्युटरवर वाचायला मिळतात. पण ही पुस्तके न वाचता रिल्ससह इतर बाबींकडे विद्यार्थ्यांचा कल वाढतो आहे. अनेकजण सुरुवातीला विरंगुळा म्हणून किंवा मुलांच्या कटकटीतून थोडी मोकळीक मिळावी, म्हणून मुलांना मोबाइल उपलब्ध करून द्यायचे. पण, उलटेच घडते आहे. आता मुलांना मोबाइलचे व्यसनच लागले असून, कधी एकदा पालकांचा फोन हातात पडतो, याकडे मुले आशेने पाहात असतात. आजूबाजूच्या गावातील शाळेतील मुलांना मित्र बनविण्यापेक्षा आता ऑनलाइन मैत्रीकडे कल दिसून येत आहे.
या खेळांचा विसर :
बालपणात काम नाही, जबाबदारी नाही, हिंडणे, फिरणे, बागडणे, इकडे तिकडे उड्या मारणे, मित्रांसोबत मस्त खेळणे एवढेच काम होते. पोहणे, सुरपारंब्या, विटी दांडू, लंगडी, गोट्या, सुरपट, लपाछपी, लंगोर, क्रिकेट यासह कितीतरी खेळ खेळत रहायचे. सुट्टीच्या दिवशी नदीवर आंघोळ, आमराईत आंबे पाडणे असे कितीतरी खेळ लहानपणी खेळायचे. आता काळ बदलला आहे. मोबाइलचा जमाना आल्यापासून मुले मैदानी खेळ विसरले. मुले जन्मल्यानंतर काही दिवसांतच त्याच्या हातात मोबाइल दिला जात आहे. मोबाइलमध्ये असलेले व्हिडिओ, रिल्स, व्हिडिओ गेम हेच मुलांचे विश्व बनत आहे..
Discussion about this post