सारथी गायकर तालुका प्रतिनिधी :
म्हसा माणगाव (ता. मुरबाड) येथील ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवक हे सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत मासिक सभेत हजर नसलेल्या सदस्याच्या नावे ठराव करत असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणात उपसरपंचांसह पाच सदस्यांनी मासिक मिटिंगवर बहिष्कार टाकत सरपंच व ग्रामसेवकांवर कारवाईची मागणी केली आहे. म्हसा माणगाव (ता. मुरबाड) येथील ग्रामपंचायतचे सरपंच जया प्रवीण घागस व ग्रामविकास अधिकारी शिवाजी मोतीराम टोहके यांनी मागील मासिक सभेत विकास कामांचा ठराव झाला नसताना मनमानी करत त्या कामांना मंजुरी देत प्रोसेडिंग मध्ये टाकले. याबाबत उपस्थित सदस्यांनी बहुमताने कोणतेही नवीन काम करायचे नाही असे ठरले असताना सरपंच व ग्रामसेवकांनी कामे टाकली. तसेच न ठरलेली कामे देखील प्रोसेडिंग मध्ये मांडताना सभेत हजर नसलेल्या सदस्याचे नाव सूचक म्हणून टाकल्याचा तसेच दोघे संगनमताने कोणालाही विश्वासात न घेता एकाच वार्डात जास्त कामे करत असल्याचा आरोप करण्यात आला. उपसरपंच दिनेश कुर्ले, ग्रामपंचायत माधुरी गायकर, लता ढमने, रमेश कुर्ले, विठ्ठल कुर्ले, वाराबाई वाघ, यांनी आज होणाऱ्या मासिक मिटिंग वर बहिष्कार टाकला आहे. सरपंच व ग्रामसेवक हे मनमानी करत असल्याचा आरोप करत गटविकास अधिकारी व उपकार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन देत सरपंच व ग्रामसेवकांवर कडक कारवाईची मागणी केलेली आहे..
Discussion about this post