
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
शेतजमिनीची फेरफार ग्रामपंचायतीत नोंदणी करण्यासाठी आणि कुक्कुटपालन व्यवसायासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी ग्रामसेवक आणि सरपंचाने १५ हजार रुपयांची लाच मागितली. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना अटक केली आहे.
तक्रारदार चंद्रपूरमध्ये राहतात. त्यांनी अजयपूर येथे शेतजमीन खरेदी केली होती. त्यावर कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करायचा होता. त्यासाठी त्यांनी 8 जानेवारीला ना हरकत प्रमाणपत्र आणि फेरफार नोंदणीसाठी अर्ज केला होता. १४ फेब्रुवारीला झालेल्या आमसभेत फेरफारचा विषय ठेवण्यात आला, तेव्हा ग्रामसेवक विकास तेलमासरे यांनी ५ हजार रुपयेवआणि लाच सरपंच नलिनी तलांडे यांनी १० हजार रुपयांची लाच मागितली.
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने १ मार्चला लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कडे तक्रार केली. ४ आणि ५ मार्चला झालेल्या पडताळणीत सरपंच आणि ग्रामसेवक लाच घेण्यास तयार असल्याचे स्पष्ट झाले. ६ मार्चला ग्रामसेवक तेलमासरे यांना पंचायत समिती कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ५ हजार रुपये लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. तसेच, सरपंच तलांडे यांनी लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याने त्यांनाही अटक करण्यात आली.
पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान आणि अपर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, रमेश दुपारे, हिवराज नेवारे, वैभव गाडगे, अमोल सिडाम, राकेश जांभुळकर, मेघा मोहूर्ले आणि सतीश सिडाम यांनी ही कारवाई यशस्वी केली..
Discussion about this post