
८ ते १० दिवसात रस्ता खुला करुन देण्याचे लेखी आश्वासन देऊन ४० दिवस उलटले अद्याप तोडगा नाही..
शिराळा / प्रतिनिधी..
रिळे (ता.शिराळा) येथील घरासमोरील वहीवाटीचा रस्ता खुला करुन न दिल्याने पवार (डवरी) समाजाच्या वतीने मंगळवार दिनांक ११ रोजी जलसमाधी आंदोलनाचा पवित्रा उचलला आहे. २६ जानेवारी रोजी गटविकास अधिकारी व तहसीलदार यांनी आठ ते दहा दिवसात सदरचा रस्ता खुला करुन देण्याचे लेखी पत्र पवार कुटुंबियांना दिले होते. परंतु ४० दिवस उलटून गेले तरीही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अद्याप तोडगा काढला नाही व दिलेला शब्द न पाळल्याने कुटुंबियांसह जलसमाधी आंदोलन करणार असल्याचे निवेदन गटविकास अधिकारी व तहसीलदार यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, घरासमोरील रस्ता प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही खुला करुन न मिळाल्याने दिनांक २५ जानेवारीपासून पवार कुटुंबियांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. तर आमची वडिलोपार्जित घरे आहेत. या घरांना प्रशासन रस्ता देत नाही तोपर्यंत उठणार नाही असा पवित्रा अबालवृद्धांसह महीला पुरुष मंडळींनी अवलंबला होता. सदर उपोषणामध्ये गरोदर महिलांसह अनेक लहान मुलांचा व वयोवृद्धांचा देखील समावेश होता.
शिराळा पोलिस ठाणे, तहसीलदार कार्यालय, शिराळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे रस्ता खुला करुन मिळावा यासाठी वारंवार पाठपुरावा करून मागणी केली होती. तहसीलदार शामला खोत-पाटील, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी सुरवातीला घटनास्थळी भेट दिली. रस्ता खुला करुन देण्याची ग्वाही ही दिली होती. परंतु पंधरा दिवस तोडगा न निघाल्याने एकीकडे सर्वजणं २६ जानेवारीचा आनंदोत्सव साजरा करत असताना रिळे येथील महिलांसह लहान मुलांना व अबाल वृद्धांना उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला होता. पवार (डवरी) कुटुंब हे रिळे (ता शिराळा) गावचे नाथपंथीय, डवरी व गोसावी समाजाचे अल्पसंख्याक असून त्यांची बौध्द समाजमंदीराच्या उत्तरेस वडिलोपार्जित जागा व घरे आहेत. सध्या तिथंच घरे व जनावरांचे गोठे पिढ्यानपिढ्या व वर्षानुवर्षांपासून आहेत. सर्वाना ये-जा करण्यासाठी घरासमोरुन वडिलार्जित वहिवाटीची रस्ता आहे. सदर रस्ता हा पुर्वीपासून आमच्या वाडवडीलांपासून वहिवाटीचा आहे असं पवार कुटुंबियांचं म्हणन आहे. तर सदर रस्त्यावर ३० वर्षापुर्वी १९९५ साली रिळे येथील गुंडा सपकाळ यांनी हि याचपद्धतीने अतिक्रमण करुन त्या रस्त्यावर काटयांची शिरे टाकली होती. परंतु गाव पातळीवर चूक मान्य करुन पंचासमोर १० रु. च्या स्टॅम्पवर असल्याचे मान्य करुन तसे लिहून देऊन सदर प्रकरण आपापसात मिटलं होतं. परंतु तब्बल ३० वर्षानंतर याच गुंडा सपकाळ यांचा मुलगा श्रीकांत सपकाळ यांने गाव गुंडाच्या सहाय्याने आमच्या वहिवाटीच्या रस्त्यावर दोन महिन्यांपुर्वी दि. ११ जानेवारी रोजी आम्हा पवार कुटुंबातील लोकांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी देवून या रस्त्यावर भिंत बांधली आहे. त्यामुळे तब्बल दोन महिन्यांपासून आम्हाला ये-जा करण्यासाठी रस्ता नाही. बायका मुलं, मुकी जनावरं उपाशीपोटी अडकून पडली आहेत. घरातून रस्त्यावर येऊ शकत नाही. त्यामुळे प्रशासनाने आम्हाला कायमस्वरूपी रस्ता दिल्याशिवाय आम्ही मुलाबाळांसह बेमुदत उपोषण केले होते.
यावेळी तहसीलदार शामला खोत-पाटील व गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी आमदार सत्यजित देशमुख, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, सरपंच बाजीराव सपकाळ यांच्यासह गावातील लोकांच्या समक्ष सदर रस्ता आठ ते दहा दिवसात खुला करुन देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. लेखी आश्वासन दिल्याने आम्ही सदरचे उपोषण मागे घेतले होते.
परंतु तब्बल चाळीस दिवस झाले तरीही संबंधित रस्ता खुला करुन दिलेला नाही. त्यामुळे सध्या परस्थिती पहाता नाविलाजास्तव आम्हाला जलसमाधी आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. अशी संतप्त भावना पवार कुटुंबातील लोकांनी निवेदनाद्वारे मांडली आहे..
Discussion about this post