लिंगवाडी ता. आजरा येथे एस टी सुरु करण्याची मागणी
एस टी सुरु न केल्यास तिव्र आंदोलन छेडणार… बहुजन मुक्ती पार्टी
आजरा: प्रतिनिधी,
आजरा :-तालुक्यातील पश्चिम भागात डोंगरामध्ये वसलेल्या लिंगवाडी येथे कित्येक वर्षे एस टी ची सुविधा नसल्याने तेथील नागरिक एस टी च्या सेवेपासून आजही वंचित राहिले आहेत. त्यामुळे या ठिकाणी एस टी सुरु करण्याच्या मागणीचे निवेदन बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आजरा एस टी आगार प्रमुखांना देण्यात आले आहे.
लिंगवाडी हे दुर्गम, अतिपावसाच्या तसेच डोंगरभागात वसलेले गाव आहे. गेली कित्येक वर्षे येथील नागरिक एस टी च्या सेवेपासून वंचित राहिले आहेत. तेथील नागरिकांनी वारंवार एस टी ची मागणी करूनदेखील आज तागायत एस टी सेवा पुरवण्यात आलेली नाही. त्यामुळे येथील रुग्ण, विद्यार्थी, वृद्ध तसेच गर्भवती महिला यांना त्रास सहन करावा लागत आहे. या भागात वन्य प्राण्यांचाही वावर जास्त असल्याने त्यांच्या जिवितास देखील हानी पोहचण्याचा मोठा धोका असतो. या गावातील नागरिक आजरा हे तालुक्याचे ठिकाण असल्याने विविध शासकीय, वैद्यकीय तसेच शैक्षणिक कामासाठी आजरा शहरावरती अवलंबून रहावे लागते. त्याचप्रमाणे दुर्गम भाग असल्याने येथील लोकांची आर्थिक स्थितीही नाजूक असल्याने यांना एस टी वरच अवलंबून रहावे लागते. स्वमालकीची वाहने नसल्याने एस टी हाच पर्याय आहे. त्यामुळे त्यांच्या या होणाऱ्या गैरसोयीकडे गांभीर्याने लक्ष देऊन तेथील नागरिकांना एस टी च्या फेऱ्या सुरु करून सेवा पुरवण्यात यावी अन्यथा बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने एस टी प्रशासनाच्या विरोधात तिव्र अंदोलन छेडण्यात येईल व या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीस एस टी प्रशासन जबादार राहील असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनावर किरण के के (जिल्हाध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी ), डॉ. उल्हास त्रिरत्ने, विजय कांबळे, अमित सुळेकर, शामराव कांबळे, विष्णुपंत कांबळे, पांडू कांबळे, शिवाजी भादवणकर, हर्षद लोंढे, वसंत राजे, बबन कांबळे, अरविंद लोखंडे आदींच्या सह्या आहेत.
Discussion about this post