
बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयावह फोटो व व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. घटनेच्या निषेधार्थ व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यााठी रविवार दि. ९ मार्च रोजी सकल मराठा समाज बांधवांकडून सांगोला बदंची हाक देण्यात आली होती. त्यामुळे रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता कृषि उत्पन्न बाजार समितीमधील जनावरांच्या बाजारासह मुख्य बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. यामुळे दिवसभर बाजारपेठेमध्ये शुकशुकाट दिसून आला. शंभर टक्के बंद ठेवण्यात आल्याने सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला.
अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच हॉटेल, किराणा दुकाने, कापड दुकाने, जनरल स्टोअर्स सह सर्वच व्यापारी बांधवांनी आपली दुकाने बंद ठेवून उस्फूर्तपणे बंद मध्ये सहभागी झाले. सकाळी १०.३० चे सुमारास महात्मा फुले चौकातून मुक मोर्चा काढत संतोष देशमुख यांच्या निघृणपणे केलेल्या हत्येचा निषेध केला. मूक मोर्चामध्ये सरपंच संतोष देशमुख व सोमनाथ सुर्यवंशी यांचे फलक तसेच काळे झेंडे हाती घेवून मोर्चात नागरिक सामिल झाले होते. सकल मराठा समाज बांधवांकडून व्यापारी, किरकोळ व्यावसायिक यांना आपापली व्यापार दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. व्यावसायिकांनी या बंदला उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
यावेळी युवा नेते यशराजे साळुंखे-पाटील, शिवाजी बनकर, सौ. स्वाती मगर, बापूसाहेब ठोकळे, अॅड. महादेव कांबळे, अरविंद केदार, सुरेश माळी, डॉ. विजय बंडगर, इरशाद बागवान यांच्यासह अनेकांनी मनोगते व्यक्त करुन आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. मोर्चामध्ये मराठा समाज बांधवांसह बहुजन समाजाबांधव, व्यापारी, शेतकरी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या..
Discussion about this post