
परभणी,दि.10(प्रतिनिधी) : परभणी शहरातील 10 वर्षीय अल्पवयीन बालीकेवर 23 फेबु्रवारी रोजी नराधमाने केलेल्या बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ सोमवारी (दि.10) येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर संतप्त हजारो महिलांसह नागरीकांनी मोठा निषेध मोर्चा काढला.
येथील लहुजी नगरातून या मोर्चास प्रारंभ झाला. मोठा मारोती मंदिर, शाही मस्जिद, महात्मा ज्योतिबा फुले पुतळा तेथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात हा मोर्चा दाखल झाला. मोर्चातील संतप्त हजारो महिलांसह नागरीकांनी काळे झेंडे फडकवले. तर कपाळास काळ्या पट्या लावल्या. काही मोर्चेकर्यांनी हातात फलके झळकावून पोलिस प्रशासनाचा धिक्कार केला.
तसेच नराधमास फाशीची शिक्षा द्या, आरोपींची नार्को टेस्ट करा, बालिका अत्याचाराचा निषेध असो, फास्ट्रॅक कोर्टात खटला चालवा यासह विविध आशयांचे, निषेधांच्या या फलकांनी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. मोर्चातील संतप्त नागरीकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मोर्चेकर्यांचा प्रचंड रोष होता, तो या मार्गा दरम्यान घोषणांच्या माध्यमातून तीव्रतेने दिसून आला.
संतप्त मोर्चेकर्यांनी पुतळा परिसरातील आंदोलनस्थळ मैदानावर ठिय्या मांडला. या ठिकाणी विविध पक्ष, संघटना, संस्थांच्या पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांनी 13 फेबु्रवारी रोजी गरिब मुलीवर घडलेल्या अमानुष अत्याचाराच्या प्रकरणाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. माध्यमांमधून या प्रकरणाबाबत सातत्याने संताप व्यक्त झाला आहे. परंतु, प्रशासनाने लहुजी नगरातील या क्रुर घटने संदर्भात फारशा गांभीर्याने दखल घेतली नाही. यातील जे आरोपी आहेत, त्यांच्या विरोधात कठोर भूमिका घेतली नाही.
या आरोपींची नार्को टेस्ट केली पाहिजे, त्यांच्या विरोधात भक्कम पुराव्या आधारे जलदगतीच्या न्यायालयात खटला चालविला पाहिजे व या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे, अशी मागणी मोर्चेकर्यांनी दिली. अन्य भागांबरोबर परभणीतसुध्दा अत्याचाराचे प्रकार वाढत असल्या बद्दल या मोर्चेकर्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. पिडीत परिवारास शासनाने दहा लाख रुपये देवून त्यांचे पुनर्वसन करावे, अशीही मागणी केली.
दरम्यान, एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर करीत या संवेदनशिल विषयाकडे आपण गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी विनंती केली.
Discussion about this post