“सततच्या पावसामुळे उडदाचे नुकसान..!”
परांडा तालुक्यामध्ये सततच्या पावसामुळे काढणीला आलेले उडीद पीक डोळ्यादेखत भिजत असल्यामुळे उत्पादकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.
पावसाळ्याच्या सुरवातीला पावसाने उशीर केल्याने पेरण्या लांबल्या होत्या. यानंतर पावसाचा खंड व आता गेल्या १५ दिवसांपासून सतत सुरू असलेला पाऊस, यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे उत्पादनात ७० ते ८० टक्क्यांहून अधिक घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

परांडा तालुक्यात नगदी पीक म्हणून उडदाच्या पिकाकडे पाहिले जाते. तब्बल १८ हजार हेक्टर क्षेत्रावर यंदा शेतकऱ्यांनी उडदाची पेरणी केलेली आहे. यावर्षी खरीप हंगामात पावसाळ्याच्या सुरवातीला पावसाने ओढ दिल्याने पेरण्या लांबल्या होत्या. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गाने कशाबशा पेरण्या उरकून घेतल्या. पिकेही जोमात आली.

यानंतर गेल्या १५ दिवसांपासून तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात सातत्याने पाऊस सुरू आहे. रविवारी तालुक्यातील काही भागात जोरदार व मध्यम स्वरूपाच्या पावसानंतर सोमवारी सकाळपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता. या पावसामुळे शेतात काढून ठेवलेले व उभे असलेली उडदाचे पीक भिजून गेले आहे.
काही ठिकाणी पिकाला कोंबही फुटत आहेत. उडदाबरोबरच बाजरी, व सोयाबीन पिकांचेही मोठे नुकसान झाले असून, थोडेफार उत्पादन हाती आले तरी भिजलेल्या या पिकांच्या झालेल्या उत्पादनाला नेमका किती भाव मिळेल, याची चिंता शेतकरी वर्गाला लागली आहे.
Discussion about this post