पाटणबोरी येथील तलाठी निलंबित
ता. प्र. गणेश बेतवार
पांढरकवडा केळापूर तहसील अंतर्गत येणाऱ्या पाटणबोरी येथील तलाठी व्ही. एन. देशमुख यांचे निलंबन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या या निलंबन आदेशामुळे महसूल वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पाटणबोरी येथील तलाठी अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत होता. तसेच याच परिसरात अवैध रेती व मुरुम उत्खनन जोमाने सुरू होते. सदर तलाठी केळापूर तहसीलदारांच्या मर्जीतील असल्याची चर्चा नेहमीच ऐकायला मिळत होती. या तलाठ्याने पाटणबोरी परिसरात अनेक वादग्रस्त कामे केल्याचे बोलले जात आहे. मात्र त्यानंतरही तलाठ्याची पाठराखण सुरू होती, त्यामुळे पाटणबोरी परिसरात तहसीलदारांच्या मुकसंमतीने तलाठ्याचा मनमानी कारभार सुरू होता. तहसीलदारांनी तलाठ्यावरकुठलीही कारवाई न केल्यामुळे केळापूर एसडीओंनी शिस्तभंगाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता. त्यामध्ये अवैध रेती वाहतुकीवर कार्यवाही न करणे, शासकीय कामात बेजबाबदारपणा दाखविणे, शासकीय वसुली न करणे, कार्यालयीन सभेला गैरहजर राहणे, मुख्यालयी गैरहजर राहणे, कारणे दाखवा नोटीसला उत्तर न देणे आदी दोषारोप तलाठ्यावर ठेवण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
केळापूर तहसील वर्तुळात खळबळ
त्यानंतर या आरोपांची चौकशी करून जिल्हाधिकाऱ्यांनी तलाठी देशमुख यांचे निलंबन केले. निलंबन काळात देशमुख यांना तहसील कार्यालय, केळापूर हे मुख्यालय देण्यात आले असून, तहसीलदारांच्या पूर्व परवानगी शिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही, असे या आदेशात नमुद आहे.
Discussion about this post