
प्रतिनिधी :राकेश धनगर
संपर्क :-८२०८५३६८८७/७७९८९४९१३६
प्रतिनिधी पाळधी १ ऑगस्ट – महाराष्ट्राचे नंदनवन व्हावे हे स्वप्न बघत लिहणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महापुरुषाने आपल्या हयातीत कधी ब्रिटिश तर कधी तत्कालीन सत्ताधारी, तर कधी तत्कालीन व्यवस्थेच्या रोषाला, दडपशाहीला तोंड दिले. त्यांचा स्वातंत्र्य चळवळ, दलित चळवळ, कामगार चळवळ, संयुक्त महाराष्ट्र लढा, गोवामुक्ती संग्राम तसेच इतर सामाजिक चळवळीतील सहभाग मोलाचा होता, असे विचार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाळधी येथे मांडले. पाळधीत काल लोकशाहीर अण्णाभाउ साठे यांची जयंतीसाजरी झाली. त्यावेळी ते बोलत होते.
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, की लोकशाहीर नाव घेताच अण्णाभाउ साठेंचे नाव ओठावर येते. तत्कालीन व्यवस्थेने अण्णा भाऊंना साफ दुर्लक्षित केले. अण्णा भाऊ प्रसिद्ध झाले आणि ते भारतीयांना कळाले याचे श्रेय हे व्यासंगी, कलासक्त विदेशी लोकांनाच जाते. त्यांच्या अनेक कलाकृतींचे जवळपास २७ परदेशी भाषांमध्ये भाषांतर झाले. १९६१ ला सोव्हिएत रशियात अण्णा भाऊंना इंडो-सोव्हिएत कल्चरल सोसायटीने रशियाला आमंत्रित करून त्यांचे गुणगौरव व आदरतिथ्य केले. मुळात १९६१ अगोदरच अण्णा भाऊंची ‘सुलतान’ आणि ‘चित्रा’ ही कादंबरी रशियात रशियन भाषेत रुपांतरित होऊन प्रचंड गाजली होती. जर परदेशी लोकांनी अण्णा भाऊंना डोक्यावर घेतले नसते, तर येथील कर्मठ व्यवस्थेने अण्णा भाऊंचे कार्य आणि इतिहास कधीच उजेडात येऊ दिला नसता. अण्णा भाऊंच्या मृत्यूनंतर सुद्धा त्यांचे व्यक्तित्व फक्त साहित्यिक म्हणून संकुचित करण्यात येत आहे. त्यांचा स्वातंत्र्य चळवळ, दलित चळवळ, कामगार चळवळ, संयुक्त महाराष्ट्र लढा, गोवामुक्ती संग्राम तसेच इतर सामाजिक चळवळीतील सहभाग आणि कार्य यावर भरीव संशोधन होणे गरजेचे आहे.
यावेळी माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, सरपंच विजयसिंह पाटील, उपसरपंच दशरथ धनगर, बारकू चव्हाण, युवराज चव्हाण, राहुल चव्हाण, रघुनाथ म्हैसाळे, मच्छिंद्र सपकाळे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post