AI तंत्रज्ञानाच्या वापराने विद्यार्थ्यांच्या साक्षरता आणि संख्याज्ञानात २० टक्क्यांपर्यंत वाढ; सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शाळा व शिक्षकांचा होणार गौरव
सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचा पाया भक्कम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या “निपुण सांगली मनपा” प्रकल्पाचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. फेब्रुवारी २०२६ च्या मूल्यमापनानुसार, विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN) कौशल्यात लक्षणीय सुधारणा झाली असून, आयुक्त श्री. सत्यम गांधी (भा.प्र.से.) यांनी या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेऊन समाधान व्यक्त केले.हा प्रकल्प Justek AI Innovation या तंत्रज्ञान भागीदाराच्या सहकार्याने अत्याधुनिक AI-आधारित प्रणालीद्वारे राबविला जात आहे. इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या सुमारे ५,००० हून अधिक विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे विश्लेषण दरमहा विद्यार्थी-निहाय केले जाते.मराठी माध्यमात सर्वोच्च स्तर गाठणाऱ्या विद्यार्थ्यांत २०%, उर्दूमध्ये १४%, तर कन्नड माध्यमात २४% वाढ झाली आहे.सर्व माध्यमांमध्ये लेखन कौशल्यात १२ ते २४% पर्यंत सुधारणा दिसून आली आहे.भागाकार स्तरापर्यंत पोहोचणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत १३% वाढ झाली असून, पायाभूत गणितात विद्यार्थ्यांनी मोठी प्रगती साधली आहे.आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना आयुक्त श्री. सत्यम गांधी यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या:प्रत्येक विद्यार्थ्याचे प्रगती पुस्तक (Report Card) तयार करून ते पालकांना दाखवण्यात यावे, जेणेकरून पालकांचा सहभाग वाढेल.प्रकल्पात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्वोत्तम ५ शाळा, ५ शिक्षक आणि ५ मुख्याध्यापकांचे रँकिंग करून त्यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.तंत्रज्ञानाच्या वापरातून प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, हाच आमचा मुख्य संकल्प असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.उपायुक्त स्मृती पाटील: “विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवून आणि शैक्षणिक अडथळ्यांवर मात करून प्रत्येक विद्यार्थ्याला उच्चतम शैक्षणिक स्तरावर नेणे, हे आमचे ध्येय आहे.”प्रशासन अधिकारी श्री. प्रकाश खेडकर: “नियमित मूल्यमापन आणि शिक्षकांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांची प्रगती आता कागदावरच नव्हे, तर प्रत्यक्षात दिसून येत आहे.”हा उपक्रम राज्याच्या ‘निपुण महाराष्ट्र’ आणि केंद्राच्या ‘निपुण भारत’ अभियानाला बळ देणारा ठरत आहे. आगामी काळात पालकांचा सक्रिय सहभाग वाढवून उच्चस्तरीय भाषा व गणित कौशल्यांवर अधिक भर देण्याचा मानस महानगरपालिका शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.या यशस्वी वाटचालीत मुख्याध्यापक, शिक्षक, केंद्र समन्वयक आणि तंत्रज्ञान टीम यांचे योगदान मोलाचे ठरत आहे.











