शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
परभणी / प्रतिनिधी :–रमेश मुलगीर
सोनपेठ तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध समस्या व मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हाधिकारी परभणी यांना एक लेखी निवेदन देऊन मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्या करण्यात आले आहेत.
जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या सध्या अनेक समस्या भेडसावत असून शेतकऱ्यांच्या महत्त्वपूर्ण मागण्यांकडे शासनाने पाठ फिरवली असल्याने त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आता सोनपेठ तालुक्यातील शेतकरी संघटना एक पाऊल पुढे सरसावली आहे. यावेळी संघटनेच्या वतीने निसर्गाच्या सुलतानी संकटाबरोबरच शासनाच्या शेतकऱ्यांप्रती असलेल्या दुजाभाव हटवून पाडण्यासाठी विविध मागण्यांचे देखील निवेदन परभणी येथील जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे.
या निवेदनावर पिकविमा ट्रिगर सुरू करण्यात यावे, पीक विम्याचा जोखीम स्तर १००% करण्यात यावा, या पिकविमा योजनेतील दोन प्रमुख मागण्यांसह घोषित केलेला १७५०० रु. पिकविमा त्वरित मिळावा, उत्पादित संपूर्ण हरभरा खरेदी करावा, कर्जमाफीच्या घोषणेनुसार कर्जबाजारी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा, महाडीबीटी, कृषी समृद्धी योजना व कृषी यांत्रिकीकरण उपअभियान २०२५-२६ मधील प्रलंबित सबसिडी तात्काळ देण्यात यावी.
या प्रकारच्या सर्व मागण्या मान्य करण्यात याव्यात अन्यथा शेतकरी संघटनेच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर तीव्र आंदोलन करण्यात येईल यासंबंधीचे निवेदन देण्यात आले आहे.










