कन्नड (प्रतिनिधी) : कन्नड तहसील कार्यालयात सोमवार, दिनांक ४ रोजी आयोजित आढावा बैठकीत आमदार संजनाताई जाधव यांनी कृषी विभागाच्या कामकाजावर भाष्य करत शेतकऱ्यांच्या हितासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.
त्या म्हणाल्या की, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी संबंधित विभागांनी अधिक जबाबदारीने काम करणे गरजेचे आहे. वीजवितरण कंपनीने शेतातील लोंबकळणाऱ्या विद्युत तारांचा प्रश्न तातडीने सोडवावा, तसेच खत विक्रेत्यांनी खताचा साठा करून कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी पीक विमा योजनेबाबत नाराजी व्यक्त करत, “शेतकऱ्यांना अद्याप विम्याचे पैसे मिळाले नाहीत, तसेच बैठकीला विमा कंपनीचे अधिकारी अनुपस्थित राहणे ही गंभीर बाब आहे,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
या बैठकीस उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी लता बागूल, तहसीलदार सारिका भगत, तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाठ तसेच पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष विठ्ठल शिरसे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.








