कर्तृत्वसंपन्न आठ महिलांची स्त्री शक्ती पुरस्कारासाठी निवड
10 ऑगस्ट रोजी पुरस्कार वितरण सोहळा
शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांचे आयोजन
अमरावती (प्रतिनिधी) ; महिला सक्षमीकरणाच्या चळवळीला गती देण्याचे कर्तव्य पार पाडत सामाजिक, शैक्षणिक राजकीय, सांस्कृतिक ,वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात उत्स्फूर्तपणे कार्य करीत समाजापुढे आदर्श निर्माण करणाऱ्या कर्तृत्वसंपन्न आठ महिलांची निवड माँ साहेब स्वर्गीय मीनाताई ठाकरे स्मृती प्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या स्त्रीशक्ती सन्मान पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
अमरावती शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित समारंभात या आठ महिलांना सौ रश्मी उद्धव ठाकरे ,शिवसेना नेत्या सुषमाताई अंधारे, माजी पालकमंत्री आमदार यशोमतीताई ठाकूर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कार निवड समितीने विविध क्षेत्रात कार्यरत महिलांच्या कामगिरीची दखल घेत या आठ कर्तृत्वसंपन्न महिलांची माँ साहेब स्वर्गीय मीनाताई ठाकरे स्मृती प्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या स्त्री शक्ती पुरस्कारासाठी निवड केली आहे. या पुरस्कारार्थीमध्ये जगप्रसिद्ध हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सचिव डॉ. माधुरी चेंडके, शैक्षणिक क्षेत्रात प्रसिद्ध दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा कीर्तीताई अर्जुन, प्रसिद्ध उद्योजिका व समाजसेविका उज्वलाताई हावरे, पीडित महिलांसाठी झटणाऱ्या समाजसेविका, लेखक व मुक्त पत्रकार रजियाताई सुलताना, वैद्यकीय क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रात कार्यरत डॉक्टर सौ रंजनाताई बनारसे, असंख्य निराधार वृद्धांचा सांभाळ करून त्यांचे पालकत्व स्वीकारणाऱ्या सुखशांती वृद्धाश्रमाच्या संचालिका श्रीमती सुमनताई रेखाते, महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती मंदाकिनीताई निमकर आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर दिशा संस्थेच्या संचालिका ऍड ज्योतीताई खांडपासोळे यांचा समावेश आहे.
बॉक्स————-
भव्य दिव्य होणार सोहळा – सुनील खराटे
माँ साहेब स्वर्गीय मीनाताई ठाकरे स्मृती प्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या स्त्रीशक्ती सन्मान पुरस्कार सोहळा भव्य दिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला असून शाल, पुष्पगुच्छ,मानपत्र आणि आकर्षक मानचिन्ह देऊन कर्तृत्ववान महिलांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमास नागरिकांनी तसेच शिवसैनिकांनी व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी केले आहे.


Discussion about this post