शिरूर | प्रतिनिधी
शिरूर शहरातील प्रसिद्ध शनी मंदिर परिसरात गेल्या सहा दिवसांपासून स्ट्रीट लाईट बंद असल्याने परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले असून भाविक आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दररोज सकाळी आणि सायंकाळी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र, प्रकाशव्यवस्था बंद असल्यामुळे त्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
विशेषतः सायंकाळच्या वेळी मंदिर परिसर अंधारमय होत असल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांसह येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक भाविकांनी संबंधित विभागाकडे तक्रारी केल्याचे सांगितले जात असले तरी अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
याबाबत शनी मंदिराचे व्यवस्थापक रवींद्र गोसावी यांनी नाराजी व्यक्त करताना सांगितले की, मंदिर परिसरातील स्ट्रीट लाईट गेल्या सहा दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. संबंधित प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन स्ट्रीट लाईट सुरू कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
भाविकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच मंदिर परिसरातील मूलभूत सुविधा सुरळीत राहण्यासाठी संबंधित विभागाने त्वरित दुरुस्तीची कामे हाती घेऊन प्रकाशव्यवस्था पूर्ववत करावी, अशी मागणी नागरिक आणि भाविकांकडून करण्यात येत आहे.
