दीर्घ उन्हाळी सुट्टीनंतर सन २०२६-२७ या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात गोगापूर येथील माध्यमिक विद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे चारचाकी गाडीतून, ढोल-ताशांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण शालेय परिसर आनंदमय वातावरणाने गजबजून गेला होता.
विद्यार्थ्यांनी नवीन गणवेश परिधान करून मोठ्या उत्साहात शाळेत हजेरी लावली. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर माजी मुख्याध्यापिका व्ही. जी. पाटील मॅडम, निवृत्त शिक्षक के. बी. पाटील सर, मुख्याध्यापक एम. आर. पटेल सर तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत केले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर राष्ट्रगीत व राज्यगीताचे गायन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. एच. सूर्यवंशी सर यांनी केले.
विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, फुले आणि नवीन शैक्षणिक साहित्य देऊन स्वागत करण्यात आले. नवीन पुस्तके आणि साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.
मुख्याध्यापक एम. आर. पटेल यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देताना शिक्षणाचे महत्त्व, वेळेचे नियोजन आणि जिद्दीने अभ्यास करण्याचे आवाहन केले. तसेच शिक्षकांनी शिस्त, संस्कार आणि अभ्यासाची गोडी याविषयी मार्गदर्शन केले.
शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना खिचडीऐवजी मसाले भात आणि गोड पदार्थ म्हणून जिलेबी देण्यात आली. या विशेष मेजवानीमुळे विद्यार्थ्यांचा आनंद अधिक वाढला.
कार्यक्रमाच्या शेवटी नवीन शैक्षणिक वर्षाच्या निमित्ताने शाळेच्या क्रीडांगणात लिंबाचे झाड लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.


