सिन्नर, दि. १९ जून – महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विविध घडामोडींना वेग आला असतानाच ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी पक्षासोबत कायम राहून निष्ठेने काम करण्याचा निर्णय घेतल्याने राज्यभरात त्यांच्या भूमिकेचे कौतुक होत आहे. दिल्लीहून नाशिकमध्ये आगमन होताच शिवसैनिकांनी रेल्वे स्थानकावर त्यांचे जल्लोषात स्वागत केले.
“शिवसेनेचा ढाण्या वाघ”, “नाशिकचे निष्ठावंत खासदार”, “सिन्नरचे भूमिपुत्र” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. शिवसैनिक आणि समर्थकांनी मोठ्या उत्साहात खासदार वाजे यांचे स्वागत करत आपला पाठिंबा व्यक्त केला.
नाशिकमध्ये आगमनानंतर खासदार राजाभाऊ वाजे यांनी आपल्या घरी जाऊन वडील प्रकाश वाजे यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी वडिलांनी त्यांना मिठी मारत प्रेमाने स्वागत केले. हा भावनिक क्षण उपस्थितांच्या चर्चेचा विषय ठरला.
यावेळी खासदार वाजे यांनी हितचिंतक व शिवसैनिकांच्या भावना जाणून घेतल्या. शिवसैनिकांच्या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेनेच्या साठाव्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई येथे आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली. संध्याकाळपर्यंत ते कार्यक्रमस्थळी रवाना होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, “गेले ते कावळे… राहिले ते मावळे…” या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रसिद्ध वक्तव्याची आठवण सध्या राज्यातील राजकीय घडामोडींमुळे पुन्हा चर्चेत आली आहे.
