तालुका प्रतिनिधी -साईनाथ कुंभार
एस. पी. पब्लिक स्कूल व वेदांता अकॅडमी मध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी बँक ऑफ बडोदाचे मॅनेजर गणेश मुळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर युवराज शिरसट यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संतोष वलगे, सचिव अश्वराज वाघ, प्रकल्प संचालिका वासंती वलगे, खजिनदार विक्रम भिंगारे, मुख्याध्यापिका स्वाती चव्हाण, उपमुख्याध्यापक कुणाल निंबाळकर, स्टेट कॅम्पस विभागप्रमुख साईनाथ कुंभार व ज्योती भोसले, सीबीएसई कॅम्पस विभाग प्रमुख सचिन डोके यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व अधोरेखित करणारी प्रभावी देशभक्तिपर भाषणे सादर केली. देशभक्तीपर गीतांवर विद्यार्थ्यांनी केलेल्या आकर्षक नृत्य सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शाळेचा परिसर देशभक्तीच्या जयघोषाने दुमदुमून गेला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक कुणाल निंबाळकर यांनी केले. सूत्रसंचालन नानासाहेब निकम, हर्षदा फासे आणि श्रुतिका गायकवाड यांनी केले.
प्रमुख पाहुणे गणेश मुळे यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याच्या मूल्यांची जपणूक करून देशाच्या प्रगतीत योगदान देण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी जबाबदार नागरिक म्हणून घडावे, असा संदेशही त्यांनी दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. उत्साह, देशभक्ती आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा सुंदर मिलाफ झाल्याने स्वातंत्र्य दिनाचा सोहळा अविस्मरणीय ठरला. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी उपस्थित विद्यार्थी व मान्यवरांना खाऊचे वाटप करण्यात आले. यामुळे आनंदी आणि उत्साहपूर्ण वातावरणात स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाची सांगता झाली.










