शाहूवाडी प्रतिनिधी :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीत, डोंगर-कपारीत वसलेल्या खोतवाडी (पोस्ट पिशवी, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) येथील चिमुकल्यांनी जिद्द, चिकाटी आणि समाजसेवेची अनोखी उदाहरण घालून दिली आहे.
गावाकडे येणाऱ्या प्रमुख रस्त्यावर मोठा खड्डा पडला होता. विशेषतः रात्रीच्या वेळी या खड्ड्यामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही समस्या गावातील चिमुकल्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कोणाची वाट न पाहता स्वतः पुढाकार घेतला.
या मुलांनी एकत्र येत मातीच्या साहाय्याने रस्त्यावरील खड्डा बुजवून घेतला. लहान वयातच समाजातील अडचणी ओळखून त्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या या मुलांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वेदांत खोत, राजवीर खोत, दर्शन खोत, श्रेया खोत आणि वेदिका खोत या चिमुकल्यांनी केलेल्या या छोट्याशा पण कौतुकास्पद उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा मोठा संदेश दिला आहे.
या मुलांनी दाखवून दिलेली जिद्द आणि समाजसेवेची भावना निश्चितच प्रेरणादायी आहे. आजची ही चिमुकली पावले भविष्यात समाजासाठी मोठे आणि विधायक कार्य करतील, असा विश्वास ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.











