चांदवड ! प्रतिनिधी समाधान शिंदे
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या दहा दिवसांपासून उपोषण सुरू असून, त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज, चांदवड तालुक्याच्या वतीने बुधवार, ९ सप्टेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले आहे.
आज सकल मराठा समाजाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चांदवड तहसीलदार तसेच चांदवड पोलीस ठाण्यात याबाबतचे निवेदन सादर केले. जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी चांदवड तालुक्यातील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवेदनावर समाजातील विविध कार्यकर्त्यांनी सह्या करून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाने तालुक्यातील समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.











