पाणीटंचाई, विकासकामे आणि ऊर्जा संवर्धनावर सदस्यांची सविस्तर चर्चा; शहर विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी
शहादा, दि. ३० (प्रतिनिधी) : शहादा नगरपरिषदेची बुधवारी झालेली सर्वसाधारण सभा काहीशी आक्रमक, मात्र खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या कै. काशिनाथ सजन पाटील सभागृहात दुपारी साडेतीन वाजता सभेला सुरुवात झाली. मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांच्यासह विविध विषय समित्यांचे सभापती तसेच सत्ताधारी व विरोधी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपनगराध्यक्ष सौ. माधवीताई मकरंद पाटील या खाजगी कामानिमित्त बाहेरगावी असल्याने अनुपस्थित होत्या.
सभेच्या विषयपत्रिकेवर एकूण १९ विषय ठेवण्यात आले होते. त्यापैकी १६ विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. यामध्ये प्रेस मारुती मैदान येथील खुल्या जागेतील वसुलीसाठी बाह्य यंत्रणेमार्फत मक्तेदार नियुक्त करणे, नगरपरिषद शाळांच्या इमारतींची दुरुस्ती व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानांतर्गत नगरपरिषद शाळा क्रमांक ३ येथे नवीन इमारत बांधणे, जैन प्लाझा ते साईबाबा नगर रस्त्याच्या प्रारंभी कमान उभारणे, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल स्मारकाचे सुशोभीकरण तसेच महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत शहादा शहर वाढीव पाणीपुरवठा योजना टप्पा-दोनच्या कामाला मुदतवाढ देणे या विषयांचा समावेश होता.
वर्ग-४ मधील सफाई कामगारांना सुट्टीचा पगार देणे, पतविक्रेता योजनेचा मसुदा अवलोकन करून हरकती व सूचना संचालनालयास कळविणे, दिव्यांगांसाठी राखीव पाच टक्के निधी खर्च करणे, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील कचऱ्यापासून वस्तू तयार करण्याचे काम खासगी संस्थेमार्फत करून घेणे, नगरपालिका हद्दीतील मोकाट गुरे-ढोरे पालकांना परत देण्यासाठी दंडाची रक्कम निश्चित करणे, साईबाबा नगरातील नारायण सोनवणे यांच्या घरासमोरील खुल्या जागेला क्रांतिवीर हुतात्मा वीरभाई कोतवाल यांचे नाव देणे तसेच कर्मचाऱ्यांना पदोन्नती देणे आदी विषयांनाही मंजुरी देण्यात आली.
दरम्यान, घनकचरा व्यवस्थापनातील स्थापत्य कामे व इतर अनुषंगिक कामांना मुदतवाढ देणे, पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेवरील पाणी बचतीचे नियोजन आणि ऊर्जा संवर्धन तंत्रज्ञानांतर्गत पंखे व दिवे बसविण्याबाबत विचारविनिमय करणे या तीन विषयांवर सभागृहात प्रदीर्घ चर्चा झाली. चर्चेनंतर हे तिन्ही विषय तूर्तास स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
दुष्काळी परिस्थिती व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन, पाणीपुरवठा विभागातील मनुष्यबळ वाढविणे, दंडात्मक कारवाई तसेच जनजागृती करण्याबाबत सदस्यांनी विविध सूचना मांडल्या. यावेळी ठेकेदारामार्फत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेची कामे डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले.
आयत्या वेळच्या विषयांमध्ये संविधान चौक सुशोभीकरण, दूरदर्शन भवन व अमरधाममधील अनुषंगिक कामे तसेच मांस विक्रीबाबत कायदेशीर कारवाई करण्याच्या विषयांनाही मंजुरी देण्यात आली.
सभेदरम्यान बांधकाम सभापती संतोष वाल्हे यांनी गेल्या नऊ महिन्यांत बांधकाम विभागाच्या वतीने शहरात एकाही कामाचा शुभारंभ झालेला नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. शहराच्या विकासासाठी नगराध्यक्षांनी विकास आराखडा (डीपी) तयार करून शासनाकडून निधी उपलब्ध करून द्यावा. यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू आणि पुढील पाच वर्षे शहर विकासासाठी सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली.
सर्वसाधारण सभेचे सूत्रसंचालन कार्यालय अधीक्षक दिलीप वसावे यांनी केले, तर आभार नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांनी मानले. बैठकीस भाजपाचे प्रतोद ज्ञानेश्वर चौधरी, पाणीपुरवठा सभापती प्रदीप ठाकरे, बांधकाम सभापती संतोष वाल्हे, आरोग्य सभापती सुनील पाटील, नगरसेवक हरीश पाटील, सागर मराठे, भारती चव्हाण, वसीम तेली, ललित छाजेड, मुनेशचंद्र जगदेव आदी उपस्थित होते.








