सहकारमहर्षी स्व. अण्णासाहेब पी. के. पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजन; फायब्रोस्कॅनसह विविध तपासण्या मोफत
शहादा, दि. ३० (प्रतिनिधी) : सहकारमहर्षी स्व. अण्णासाहेब पी. के. पाटील यांच्या जयंतीनिमित्त श्री पी. के. अण्णा पाटील फाउंडेशन, शहादा आणि विविध शहर व ग्राम लेवा पाटीदार ग्लोबल गुजर मंडळ (VSGGM) यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांसाठी भव्य मोफत पोटविकार निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, ९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत लोणखेडा–विद्याविहार येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात हे शिबिर होणार आहे.
या शिबिरात सुरत येथील पोटविकार तज्ज्ञ व सर्जिकल गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट डॉ. जय चोकशी (MBBS, MS-General Surgery, DNB-Surgical Gastroenterology, FMAS) रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी लिव्हर व पित्ताशयाचे आजार, स्वादुपिंडाचे आजार, पोट व आतड्यांचे विविध विकार, लॅप्रोस्कोपिक सर्जरी तसेच आतड्यांमधील रक्तस्राव आणि पचनसंस्थेशी संबंधित आपत्कालीन समस्यांबाबत वैद्यकीय सल्ला देण्यात येणार आहे.
शिबिरात ठरावीक रक्त व लघवीच्या तपासण्यांसह लिव्हरची फायब्रोस्कॅन तपासणी मोफत करण्यात येणार आहे. तपासण्यांचे अहवाल २ ते ३ दिवसांत उपलब्ध झाल्यानंतर रुग्णांना व्हॉट्सॲपद्वारे पाठविण्यात येणार आहेत. अहवालात गंभीर बाब किंवा अनियमितता आढळल्यास पुढील उपचारांसाठी महाराष्ट्र व गुजरातमधील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये विशेष सवलत मिळवून देण्यासाठी सहकार्य केले जाणार आहे.
शिबिरास येताना रुग्णांनी जुने रक्त तपासणी अहवाल, एक्स-रे, इतर वैद्यकीय अहवाल तसेच सध्या सुरू असलेल्या औषधांची प्रिस्क्रिप्शन सोबत आणावी. शिबिराच्या नियोजनासाठी ७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्वनोंदणी करणे आवश्यक असून, नावनोंदणी करताना संपर्क व व्हॉट्सॲप क्रमांक अचूक देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नावनोंदणीसाठी सौ. कल्पना काशीनाथ पटेल (मो. ७९७२५९९४७४), सौ. हेमलता पाटील, पुणे (मो. ९४२०७९९०४१), प्रा. मिलिंद जगन्नाथ पाटील (मो. ७५१७९५५९५६) आणि श्री चेतनभाई चौधरी, चौधरी मेडिकल व वेलनेस, शहादा/प्रकाशा (मो. ८८८८६११४४८) यांच्याशी संपर्क साधावा.
या शिबिरासाठी युनिव्हर्सल सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, सुरत यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. परिसरातील गरजू नागरिकांनी या मोफत वैद्यकीय शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन श्री पी. के. अण्णा पाटील फाउंडेशन आणि VSGGMच्या वतीने करण्यात आले आहे.








