गांधी चौकातील औषध विक्रेत्याच्या निवासस्थानी चौकशी; तपास यंत्रणेचे नाव अद्याप स्पष्ट नाही
वणी, दि. १ (प्रतिनिधी) : वणी शहरात गुरुवारी पहाटे सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास एका तपासणी पथकाने विविध ठिकाणी कारवाई सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. गांधी चौक परिसरातील एका औषध विक्रेत्याच्या ‘नीलकंठ निवास’ येथील निवासस्थानीही पथकाकडून चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
पहाटेच्या सुमारास तपासणी पथक दाखल झाल्याने परिसरात चर्चेला उधाण आले. संबंधित पथक ईडी, सीबीआय किंवा अन्य केंद्रीय तपास यंत्रणेचे असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे. मात्र, तपासणी करणाऱ्या यंत्रणेचे अधिकृत नाव अथवा कारवाईचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
वणी शहरातील या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले असून, संबंधित ठिकाणी नेमकी कोणत्या प्रकरणाच्या अनुषंगाने तपासणी सुरू आहे, याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. तपासणीदरम्यान कोणती कागदपत्रे अथवा अन्य बाबी आढळून आल्या, याचीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
दरम्यान, अधिकृत तपास यंत्रणा किंवा संबंधित प्रशासनाकडून माहिती उपलब्ध झाल्यानंतरच कारवाईचे स्वरूप आणि त्यामागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चर्चांवर अधिकृत पुष्टी होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणे घाईचे ठरणार आहे.







