स्वच्छ भारताचा संदेश देत विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे उत्स्फूर्त श्रमदान
नसरापूर : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या नसरापूर (ता. भोर, जि. पुणे) येथील शंकरराव भेलके महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले.
महात्मा गांधी यांनी दिलेला स्वच्छतेचा संदेश प्रत्यक्ष कृतीत आणण्याच्या उद्देशाने आयोजित या अभियानात एनएसएस स्वयंसेवक, विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी महाविद्यालय परिसर, क्रीडांगण तसेच परिसरातील प्लास्टिक कचरा व सुका पालापाचोळा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावली. यावेळी विद्यार्थ्यांना व उपस्थितांना प्लास्टिकमुक्तीचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शर्मिला चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वच्छता ही केवळ २ ऑक्टोबरपुरती मर्यादित न राहता दैनंदिन जीवनाचा भाग झाली पाहिजे, असे सांगितले. युवा वर्गाने स्वच्छ व सुंदर भारताच्या निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या स्वच्छता अभियानाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. गणपत आवटे व प्रा. डॉ. दत्तात्रय घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. अभियानात डॉ. सचिन घाडगे, प्रा. माऊली कोंडे, प्रा. महेश कोळपे, प्रा. वैष्णवी कोंडे, प्रा. सहदेव रोडे, प्रा. भगवान गावित, प्रा. संदीप लांडगे, जीवन गायकवाड, प्रा. भूषण समगीर, डॉ. रोहिदास ढाकणे, शिवाजी सोनवणे, सीमा देशमुख, महेश दळवी, मोहिते, अभिजीत मोरे, धनाजी माने, सुमित कांबळे यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. जी. डी. आवटे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. दत्तात्रय घोडके यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी परिसर स्वच्छ ठेवण्याची तसेच इतरांनाही स्वच्छतेसाठी प्रवृत्त करण्याची शपथ घेतली.











