नगराध्यक्ष किरण गायकवाड यांच्यासह नगरसेवक, अधिकारी-कर्मचाऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग
धाराशिव, उमरगा : प्रतिनिधी
गांधी जयंतीचे औचित्य साधून उमरगा नगरपरिषदेच्या वतीने गुरुवारी सकाळी ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत शहरातील विविध भागांत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळी ७ वाजता सुरू झालेल्या या मोहिमेत नगरपरिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत स्वच्छतेचा संदेश दिला.
शहरातील प्रमुख रस्ते, सार्वजनिक ठिकाणे तसेच विविध परिसरांमध्ये स्वच्छता करण्यात आली. ठिकठिकाणी साचलेला कचरा हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी नागरिकांनी कचरा रस्त्यावर न टाकता सार्वजनिक स्वच्छता राखण्यासाठी नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
या स्वच्छता मोहिमेत नगराध्यक्ष किरण रविंद्र गायकवाड, उपाध्यक्ष विजय वाघमारे, स्वच्छता सभापती विशाल काणेकर, नगरसेवक विजयकुमार दळगडे यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
‘स्वच्छ शहर हीच खरी सेवा’ हा संदेश देत नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली. शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांचा सक्रिय सहभागही तितकाच महत्त्वाचा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.











