महात्मा गांधींच्या सत्य-अहिंसेचा आणि शास्त्रीजींच्या ‘जय जवान, जय किसान’ विचारांचा विद्यार्थ्यांना संदेश
वंधली, दि. २ ऑक्टोबर (प्रतिनिधी) : साई विद्यालय वंधली येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती तसेच भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा व स्वच्छतेच्या विचारांसह लालबहादूर शास्त्री यांच्या साधेपणा, देशभक्ती आणि ‘जय जवान, जय किसान’ या घोषणेचे महत्त्व विशद केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी भाषणे, देशभक्तिपर गीत तसेच विविध उपक्रमांच्या माध्यमातून दोन्ही महापुरुषांना आदरांजली वाहिली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्याची माहिती देत त्यांच्या विचारांचा दैनंदिन जीवनात अंगीकार करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक प्रविण मा. बरबटकर, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.









