रायगड सफरीदरम्यान दुर्घटना; ४८ जणांच्या गटातील आठ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत, आळंदीत शोककळा
दिवेआगर : रायगड जिल्ह्यात पर्यटनासाठी गेलेल्या आळंदी येथील विद्यार्थ्यांच्या सहलीवर दुर्दैवी संकट कोसळले. दिवेआगर समुद्रकिनारी पाण्यात उतरलेल्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेमुळे आळंदी तसेच पुणे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विनर्स अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीत एकूण ४८ जणांचा समावेश होता. त्यामध्ये २५ मुले, १७ मुली आणि सहा शिक्षकांचा समावेश होता. रायगड किल्ला तसेच परिसरातील पर्यटनस्थळांना भेट दिल्यानंतर हा गट दिवेआगर समुद्रकिनारी पोहोचला.
समुद्रकिनारी काही विद्यार्थी पाण्यात उतरले असताना अचानक निर्माण झालेल्या समुद्राच्या प्रवाहामुळे आठ विद्यार्थी खोल पाण्यात ओढले गेल्याचे सांगण्यात येत आहे. घटना लक्षात येताच स्थानिक ग्रामस्थ आणि महाकाली वॉटर स्पोर्ट्सच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. महसूल प्रशासन, पोलीस आणि आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले.
बचाव पथकाच्या प्रयत्नांनंतर आठही विद्यार्थ्यांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी बोर्ली पंचतन प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, दुर्घटनेची माहिती आळंदीत पोहोचताच विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. सहलीदरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या, समुद्रात उतरण्यापूर्वी आवश्यक सूचना देण्यात आल्या होत्या का आणि देखरेखीची व्यवस्था कशी होती, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
घटनेची प्रशासनाकडून चौकशी सुरू असून, निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पालक व नागरिकांकडून होत आहे. या दुर्घटनेमुळे शैक्षणिक सहली तसेच समुद्रकिनारी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.




