१२ लाख ८० हजार रुपयांचे मोबाईल तक्रारदारांना परत मिळणार
फलटण प्रतिनिधी : फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गहाळ व हरवलेल्या मोबाईलबाबत दाखल तक्रारींची दखल घेत पोलिसांनी सीईआयआर (CEIR) पोर्टलच्या माध्यमातून मोहीम राबवून १२ लाख ८० हजार रुपये किमतीचे ७१ मोबाईल शोधून काढले.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हे मोबाईल सातारा जिल्ह्यासह कर्नाटक, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात वापरले जात असल्याचे समोर आले. पोलिसांनी संबंधित व्यक्तींशी संपर्क साधून कायदेशीर बाबी समजावून सांगत मोबाईल परत मिळवले. काही मोबाईल थेट तर काही कुरिअरद्वारे ताब्यात घेण्यात आले.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण ग्रामीण पोलिसांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली.




