२५ वर्षे भारतीय सैन्यात सेवा बजावल्याबद्दल निमसोड पंचक्रोशीच्या वतीने सन्मान
प्रतिनिधी –
निमसोड : खटाव तालुक्यातील निमसोड गावचे सुपुत्र, नायक सुभेदार व तोफखाना प्रशिक्षक सहदेव बबन घाडगे यांनी भारतीय सैन्यात तब्बल २५ वर्षे देशसेवा बजावल्यानंतर सेवानिवृत्ती घेतली. मायभूमी निमसोड येथे आगमन झाल्यानंतर निमसोड पंचक्रोशी तसेच खटाव तालुक्यातील ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा भव्य सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहात पार पडला.
सहदेव घाडगे यांच्या गावात आगमनावेळी ग्रामस्थांनी ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी गावातील नागरिकांनी त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या २५ वर्षांच्या देशसेवेचा गौरव केला.
निमसोड येथील घाडगे मळा येथे आयोजित गौरव समारंभास ग्रामस्थ, मित्रमंडळी, नातेवाईक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. खटावच्या दुष्काळी मातीतून भारतीय सैन्यात दाखल होऊन प्रदीर्घ काळ देशसेवा बजावलेल्या सहदेव घाडगे यांच्या कार्याचा उपस्थितांनी अभिमान व्यक्त केला.
यावेळी उपस्थितांनी सहदेव घाडगे यांना सेवानिवृत्तीनंतरच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या देशसेवेचा आदर्श युवा पिढीसाठी प्रेरणादायी असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.











