केज ( नांदुर घाट प्रतिनिधी):
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील नेहमीच विविध वादांमुळे चर्चेत असलेल्या नांदूरघाट ग्रामपंचायतीचा कारभार पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. सततचे भ्रष्टाचाराचे आरोप, घोटाळ्यांचे वाद आणि अधिकाऱ्यांवर होणारे गुन्हे यांमुळे नांदूरघाट ग्रामपंचायतीत येण्यास कोणताही ग्रामविकास अधिकारी किंवा ग्रामसेवक धजावत नसल्याचे गंभीर चित्र निर्माण झाले आहे. “नांदूरघाट म्हटलं की नको रे बाबा!” अशीच परिस्थिती सध्या प्रशासकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि नागरी समस्या ऐरणीवर
ग्रामपंचायतीत कायमस्वरूपी आणि पूर्णवेळ अधिकारी नसल्यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रस्ते, स्वच्छता तसेच इतर विकासकामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. नागरिकांना दैनंदिन लागणारे महत्त्वाचे दाखले, १५ व्या वित्त आयोगाची कामे आणि घरकुलांचे प्रस्ताव प्रलंबित पडल्याने ग्रामस्थांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
प्रभारी कारभाराचा खेळ आणि भ्रष्टाचाराचे सावट
सध्या ग्रामपंचायतीत अधिकारी फक्त काही दिवसांसाठी अतिरिक्त (प्रभारी) कारभार सांभाळण्यासाठी येतात. तात्पुरत्या पदभारावर येणारे अधिकारी गावात उपस्थित राहत नाहीत तसेच त्यांच्याकडे ग्रामपंचायतीचे महत्त्वाचे दस्तऐवज आणि कागदपत्रेही नसतात.
सध्याचे ग्रामपंचायत अधिकारी श्री. शिरसाट बी. वाय. यांच्यावर गुन्हा नोंद झालेला असून ते ग्रामपंचायतीत अनुपस्थित राहत आहेत. तसेच ग्राम रोजगार सेवक (GRS) हे पदही रिक्त असल्याने मस्टर भरणे, मोजमाप व मजुरांची हजेरी अशी कामे रखडली आहेत, ज्यामुळे मनरेगा मजुरांचे पेमेंट थबकले आहे.
उपसरपंचांसह ८ सदस्यांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
या साऱ्या सावळागोंधळाला कंटाळून नांदूरघाट ग्रामपंचायतीचे उपसरपंच जगदिश आंधळकर यांच्यासह ८ सदस्यांनी केज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी साहेब यांना सामूहिक अर्ज सादर करून स्वतंत्र व पूर्णवेळ ग्रामपंचायत अधिकारी देण्याची मागणी केली आहे.
अर्जावर स्वाक्षरी / अंगठा असलेले सदस्य:
१. जगदीश बापुराव आंधळकर (उपसरपंच)
२. काशीबाई माधवराव मोराळे (सदस्य)
३. बदृनिसा गुलाम दस्तगीर शेख (सदस्य)
४. उर्मिला रामेश्वर खोमणे (सदस्य)
५. सोनाली आसाराम तारळकर (सदस्य)
६. वंदना सुदाम गायकवाड (सदस्य)
७. संकेतकुमार संजय नवले (सदस्य)
८. सोमनाथ सुरेश जाधव (सदस्य)
सदर अर्जाच्या प्रति बीडचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवण्यात आल्या आहेत. आता तरी वरिष्ठ प्रशासन नांदूरघाट ग्रामपंचायतीचा हा भ्रष्टाचाराचा आणि भोंगळ कारभाराचा चक्रव्यूह भेदून कायमस्वरूपी अधिकारी देणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.









