जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी
पालघर : सौरभ कामडी
शासनाने यंदा थकीत असलेल्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ केले असले तरी, तांत्रिक अडचणींमुळे अनेक पात्र शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी नव्याने पीक कर्ज मिळालेले नाही. ३० सप्टेंबर ही कर्ज वाटपाची अंतिम मुदत संपल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर पंचायत समितीचे माजी सभापती आणि शिवसेना विक्रमगड विधानसभा संघटक प्रदीप माधव वाघ यांनी जिल्हाधिकारी पालघर यांच्याकडे पीक कर्ज वाटपाला मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.
प्रदीप वाघ यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या कर्जमाफी योजनेनंतर ज्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले आहे, त्यांना चालू खरीप हंगामात नव्याने पीक कर्ज देणे अपेक्षित होते. मात्र बँक स्तरावरील तांत्रिक अडचणी आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे अनेक ठिकाणी ३० सप्टेंबरच्या आत कर्ज वाटप प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही.
त्यामुळे कर्जमाफी होऊनही शेतकऱ्याला पुन्हा सावकाराच्या दारात जाण्याची वेळ येत आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मागणी काय?
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, इतर राष्ट्रीयकृत बँका आणि सहकारी संस्थांना पीक कर्ज वाटपासाठी आणखी १५ ते ३० दिवसांची मुदतवाढ द्यावी, जेणेकरून एकही पात्र शेतकरी कर्जापासून वंचित राहणार नाही, अशी मागणी वाघ यांनी केली आहे.
या निवेदनाच्या प्रती जिल्हा उपनिबंधक, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आणि संचालक यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.
“कर्जमाफीचा खरा फायदा तेव्हाच होईल जेव्हा शेतकऱ्याला वेळेत नवं पीक कर्ज मिळेल. शासनाने घोषणा केली, पण बँकांनी वेळेत वाटप केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी मुदतवाढ गरजेची आहे.” – प्रदीप वाघ








