४० प्रवाशांचा ग्रुप; महिलांना ५० टक्के सवलत, ज्येष्ठांना मोफत प्रवासाची असेल सवलत.
नंदुरबार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे-एसटी संगे तीर्थाटन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांतील तीर्थक्षेत्रांना सामूहिकरित्या भेट देण्याची संधी भाविकांना उपलब्ध झाली आहे. नंदुरबार तालुक्यातील तसेच शहरातील भाविकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नंदुरबार आगारप्रमुख सुनील महाले यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत ४० प्रवाशांचा एक ग्रुप तयार करून विविध तीर्थक्षेत्रांना भेट देता येणार आहे. कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच अन्य भाविकांना एकत्रितपणे तीर्थयात्रेचे नियोजन करता येणार असल्याने प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. महाराष्ट्राबरोबरच देशातील अन्य राज्यांमधील तीर्थक्षेत्रांचीही या योजनेतून प्रवास करता येणार आहे.
योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांना एसटी प्रवासात लागू असलेली ५० टक्के तिकीट सवलत मिळणार आहे. तसेच ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रेसाठी मोठा लाभ होणार आहे.
धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन देतानाच भाविकांना सुरक्षित व सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. नंदुरबार तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील भाविकांनी ग्रुप तयार करून योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी नंदुरबार एसटी आगाराशी संपर्क साधावा, असे आवाहन आगारप्रमुख सुनील महाले यांनी केले आहे.










