“पाणी वाचवूया, भविष्य घडवूया”; गळती, पाण्याचा गैरवापर आढळल्यास तात्काळ माहिती देण्याचे आवाहन.
कणकवली दि.५ ऑक्टोबर (तालुका प्रतिनिधी) अल निनो आणि आयओडीच्या प्रभावामुळे आगामी काळात पर्जन्यमानात घट होण्याची शक्यता लक्षात घेता, भविष्यात कणकवली शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी कणकवली नगरपंचायतीने नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन केले आहे. “पाणी वाचवूया, भविष्य घडवूया” या संदेशातून प्रत्येक नागरिकाने पाण्याचा जपून आणि नियोजनपूर्वक वापर करावा, असे आवाहन मुख्याधिकारी, नगराध्यक्ष आणि नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
कणकवली शहरातील नागरिकांनी आपल्या प्रभागात तसेच नगरपंचायतीच्या मुख्य पाणीवाहिनीवर कुठेही गळती होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती तात्काळ नगरपंचायत प्रशासनाला द्यावी. त्याचबरोबर पाण्याचा कुठेही गैरवापर किंवा अपव्यय होताना दिसल्यास त्याबाबतही नगरपंचायतीला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी आपल्या घरातील नळ कनेक्शन, पाण्याच्या टाक्या तसेच पाईपलाईनमध्ये गळती असल्यास ती तातडीने दुरुस्त करून घ्यावी. नादुरुस्त नळ दुरुस्त करून पाण्याची गळती थांबवावी. प्रत्येक नागरिकाने आवश्यक तेवढेच पाणी वापरून पाण्याचा अपव्यय टाळल्यास भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई टाळण्यास मोठी मदत होणार आहे.
वाहन, रस्ते आणि बांधकामासाठी पाण्याचा अपव्यय टाळा
नगरपंचायतीने नागरिकांना वाहन, अंगण, रस्ते आदी धुण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच बांधकामाच्या ठिकाणी होणारा अनावश्यक पाण्याचा वापर कमी करावा. घरगुती तसेच सार्वजनिक पाणीपुरवठ्याचा साठा काळजीपूर्वक आणि नियोजनपूर्वक वापरण्याची गरज असल्याचे नगरपंचायतीने स्पष्ट केले आहे.
सार्वजनिक ठिकाणी नळ सुरू राहिलेला किंवा पाणी वाया जात असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ नगरपंचायतीला माहिती द्यावी. पाणी चोरी, अनधिकृत नळजोडणी किंवा पाण्याचा गैरवापर आढळल्यासही प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रत्येक नागरिकाचा सहभाग मोलाचा.
कणकवली शहराला पाणीटंचाईमुक्त आणि समृद्ध ठेवण्यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांसोबतच प्रत्येक नागरिकाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. भविष्यात पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध राहावे यासाठी आजपासूनच पाण्याची बचत करणे आवश्यक आहे. त्यामुळे “पाणी वाचवूया, भविष्य घडवूया” हा संकल्प प्रत्येक नागरिकाने करावा आणि कणकवली नगरपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून पाणी बचतीच्या या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे नगरपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
संपर्क : श्री. प्रशांत पिळणकर – ९४२०३०६२०३
कणकवली नगरपंचायत हेल्पलाईन : ०२३६७-२३२००७










