विविध गावांमध्ये प्रचार-प्रसार; मानवतेचा संदेश देत आध्यात्मिक सत्संगाचे आयोजन
फुलंब्री | प्रतिनिधी
मानवतेचा संदेश आणि समाजकल्याणाचा उद्देश समोर ठेवून संत निरंकारी मिशनच्या वतीने फुलंब्री तालुक्यात विविध भागांमध्ये जनजागृती व प्रचार-प्रसाराचा उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘माणसा तू माणूस बन’, ‘मानव को हो मानव प्यारा, एक दूजे का बने सहारा’ यांसारख्या संदेशांच्या माध्यमातून मानवता, बंधुभाव आणि समाजसेवेचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
संत निरंकारी मिशनचे भक्त विविध गावांमध्ये जाऊन जनजागृतीसाठी आपला वेळ देत असून, समाजसेवेच्या माध्यमातून मानवतेचा संदेश देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. फुलंब्री तालुक्यातील विविध गावांमधील संत-महात्मे या उपक्रमात सहभागी होत आहेत.
या उपक्रमांतर्गत ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत देवगिरी साखर कारखाना परिसरातील रंगनाथजी नागरे यांच्या निवासस्थानी भक्तिमय आध्यात्मिक सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी संत निरंकारी मिशन शाखा बाजार सावंगीचे मुखी महात्मा एस. बी. नलावडे यांनी प्रमुख सेवा बजावली. आपल्या मार्गदर्शनातून त्यांनी उपस्थित भक्तांना मानवता, बंधुभाव आणि परमात्म्याच्या स्मरणाचा संदेश दिला. ‘परमपिता परमात्मा, सब तेरी संतान, भला करो सबका, प्रभू सबका हो कल्याण’, या आशीर्वादपर संदेशातून उपस्थितांना प्रेरणा देण्यात आली.
यावेळी ग्रामीण तसेच शहरी भागात विविध ठिकाणी जाऊन प्रचार-प्रसार करणारे युवा प्रचारक महात्मा विकासजी भाले पाथ्रीकर यांचीही उपस्थिती होती. फुलंब्री तालुक्यातील विविध गावांमधून संत-महात्मे आणि भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
सत्संगाच्या माध्यमातून अध्यात्मासोबतच मानवता, परस्पर सहकार्य आणि समाजसेवेचा संदेश देण्यात आला. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत मानवतेचा विचार पोहोचविण्यासाठी संत निरंकारी मिशनच्या वतीने सुरू असलेल्या या उपक्रमाला विविध गावांमधून प्रतिसाद मिळत आहे.










