दि. ७/१०/२०२६
हुजूरपागा गर्ल्स इंग्लिश मिडियम स्कूल,कात्रज- मांगडेवाडी, पुणे येथे कवितेची कार्यशाळा संपन्न झाली.
‘कविता म्हणजे भावनांचा खेळ, मनातील विचारांचा ताळमेळ’
कवितेच्या कार्यशाळेचे बहुमोल मार्गदर्शन वसुधा वैभव नाईक यांनी केले. वसुधा नाईक यांचे वसुधा फाउंडेशन आहे.त्या स्वतः संस्थापिका,अध्यक्ष असून त्या एक निवृत्त उपक्रमशील शिक्षिका म्हणून प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर कवयित्री, लेखिका आणि समाजसेविका आहेत. गेली वीस वर्षांपासून त्यांचे हे कार्य अविरत चालू आहे. वसुधा फाउंडेशन आणि त्यांची टीम गौरव,योगेश, मयुरी, सायली हे सर्व उत्तम साथ त्यांना देतात एकमेकांच्या सहकार्याने कोणतेही कार्य उत्तम होते. कवितेच्या कार्यशाळेमध्ये कवितांच्या विविध प्रकारांवर भर देण्यात आला. आठवी, नववीच्या पाठ्यपुस्तकातील कवितांच्या आधारे विविध प्रकार समजावून दिले गेले. कवितांचे गायन केले गेले. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, भेटी लागे जीवा, भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी अशा अजरामर गीतांसहित अतिशय उत्तम उदाहरणे देऊन मुलींना कविता कशी करायची, यमक शब्दांचे महत्व आणि कवितेचे विविध प्रकार समजावून सांगितले गेले.
मुलींना स्वतः मधीलच चार गुण लिहिण्यास सांगून वसुधा मॅडमने पण स्वतःतील चार गुण लिहिले व त्या गुणांवर आधारित कविता सादर केली.
याचाच आधार घेऊन जवळ जवळ वीस मुलींनी चारोळी,आठोळी अशा कविता तयार केल्या यालाच आपण शीघ्र कवी म्हणतो. आणि या तीनशे मुलींमधून ऑन द स्पॉट आम्हाला वीस मुली कविता करणाऱ्या मिळाल्या. अजून बऱ्याच जणी तयार होणार हे निश्चित.
या कवितेच्या कार्यशाळेच्या माध्यमातून असे समजून आले की मुलांना मार्गदर्शनाची गरज आहे. मार्गदर्शन व्यवस्थित झाले तर उत्तम कवी निश्चितच घडू शकतात. कवितेची कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी मा. मुख्याध्यापिका कीर्ती पंडित मॅडम,हुजूरपाच्या शाळेचे सर्व शिक्षक, मावशी, काका आणि विद्यार्थिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
शेवटी एकच सांगते..
शब्दांची ओंजळ आणि भावनांची साथ
कवितेने धरूया सृजनाची वाट
लेखणीच्या स्पर्शातून उमलू दे कविता
मनामनांत जागवूया साहित्याची पहाट…..
वसुधा वैभव नाईक, पुणे









