दर्यापूर च्या कृषी विभाग आत्मा चे शेतकऱ्यांना आवाहन
दर्यापूर : यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने काही भागात कोरड्या दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यात मुख्य पिक कपाशी असल्याने रब्बी क्षेत्र अत्यल्प आहे. आगामी रब्बी हंगामात क्षेत्र वाढी करीता आत्मा यंत्रानेच्या वतीने करडी जवस मोहरी या कमी पाण्यात येणाऱ्या पिकाचे प्रात्याक्षिक राबविण्यात येते आहे. याकरिता सद्या उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून योग्य पिकांची निवड करण्याचे आवाहन आत्मा यंत्रनेने शेतकऱ्यांना केले आहे.
कमी पाण्यात हरभरा, करडई, मोहरी, रब्बी ज्वारी व जवस या पिकांचा विचार करता येतो. उपलब्ध ओलावा, जमिनीचा प्रकार, पर्जन्यमान आणि सिंचनाची उपलब्धता यानुसार शेतकऱ्यांनी पिकांची निवड करावी.
शेतकऱ्यांनी पिकांची निवड करताना पेरणीपूर्वी जमिनीतील उपलब्ध ओलावा तपासून योग्य वेळी पेरणी करणे तसेच उपलब्ध हिवाळी ओलाव्याचा जास्तीत जास्त वापर करणे महत्त्वाचे असल्याचे कृषी विभागाच्या अर्चना निस्ताने प्रकल्प संचालक आत्मा यांनी केले आहे.
दर्यापूर तालुक्याचे कृषी अधिकारी कु. आरती साबळे यांनी शेतकऱ्यांना कमी पाण्यातील पीक नियोजनाबाबत मार्गदर्शन करताना उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले. संरक्षित पाणी उपलब्ध असल्यास हरभरा व करडई, जवस यांसारख्या पिकांना प्राधान्य देता येईल, तर एक ते दोन संरक्षित पाणी उपलब्ध असल्यास हरभरा, किंवा रब्बी ज्वारीचा विचार करता येईल, असे त्यांनी सांगितले.
बीबीएफसारख्या योग्य जमीन व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब केल्यास पाण्याचे व्यवस्थापन व जमिनीतील ओलावा संवर्धनास मदत होऊ शकते. तण नियंत्रण वेळेवर करून पिकाची पाण्यासाठीची स्पर्धा कमी करणे आणि उपलब्ध संरक्षित पाण्याचा पिकाच्या संवेदनशील अवस्थेत प्राधान्याने वापर करणे आवश्यक आहे.
कमी पाणी, योग्य पीक, योग्य वेळ, योग्य पाणी व्यवस्थापन या सूत्रानुसार शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाचे नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभाग आत्मा यंत्रणे कडून केले आहे.







