पिके हाती न आल्याने उदरनिर्वाहासाठी स्थलांतर; दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि मजुरांसमोर आर्थिक संकट
आष्टी (प्रतिनिधी) शशिकांत जरांगे :
आष्टी तालुक्यातील सुरडी गावातील ऊसतोड मजुरांनी यंदा दसरा सण येण्यापूर्वीच ऊसतोडीसाठी कारखान्याची वाट धरली आहे. पावसाअभावी पाणीटंचाई निर्माण झाल्याने शेतात अपेक्षित पीक आले नाही. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न निर्माण झाल्याने मजुरांना सणासुदीच्या दिवसांतच गाव सोडून कामासाठी बाहेर पडावे लागत आहे.
ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह शेती आणि ऊसतोडीवर अवलंबून असतो. मात्र, पाण्याअभावी शेतजमिनीतील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हातात उत्पन्न उरलेले नाही. शेतीतून रोजगार मिळत नसल्याने ऊसतोड मजुरांना आपल्या कुटुंबासह साखर कारखान्यांकडे स्थलांतर करावे लागत आहे.
दसरा हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण मानला जातो. मात्र, सुरडी गावातील या मजुरांना सण साजरा करण्याऐवजी रोजगारासाठी गावाबाहेर पडावे लागत आहे. लहान मुलांसह कुटुंबांना ट्रॅक्टर व इतर वाहनांतून संसारोपयोगी साहित्य घेऊन ऊसतोडीसाठी जावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे.
पाण्याअभावी शेती पिकली नाही, तर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा? असा गंभीर प्रश्न शेतकरी आणि शेतमजुरांसमोर उभा राहिला आहे. पावसाच्या अनिश्चिततेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम या परिस्थितीतून स्पष्ट होत आहे.
दसऱ्याआधीच गाव सोडण्याची वेळ!
सणासुदीच्या काळात प्रत्येक कुटुंबाला आपल्या गावात राहून आनंदाने सण साजरा करावा, असे वाटते. परंतु शेतीतून उत्पन्न मिळत नसल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी सुरडी गावातील ऊसतोड मजुरांना दसऱ्यापूर्वीच स्थलांतर करावे लागत आहे. या परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील पाणीटंचाई आणि रोजगाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.











