माजलगाव: प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी
तालुक्यातील सोमठाणा येथे नुकताच एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह सोहळा संपन्न झाला आहे. आजच्या काळात लग्न म्हटले की,बँड-बाजा, वरात, पैशांची अवाजवी उधळण आणि अन्नपदार्थांची नासाडी हे समीकरण सामान्य झाले आहे. परंतु,या दिखाऊ संस्कृतीला फाटा देत सोमठाणा येथील ग्रामस्थांनी आणि संबंधितांनी अत्यंत संवेदनशीलतेचा आणि साधेपणाचा नवा परिचय दिला आहे.
कोणतीही अनावश्यक उधळण न करता अगदी मोजक्या खर्चात हा विवाह पार पडला.
या विवाह सोहळ्यात ईदगाह मोहल्ला माजलगाव येथील मुनीर शेख यांचे सुपुत्र शेख तालेब मुनीर यांचा विवाह सोमठाणा येथील रफिकखा पठाण यांच्या सुकन्या शबनम रफिकखा पठाण यांच्यासोबत अत्यंत साध्या वातावरणात संपन्न झाला.नवरदेवाकडील आणि नवरीकडील अगदी मोजक्याच जवळच्या पाहुण्यांच्या उपस्थितीत वरपक्षाची मंडळी आली आणि कोणतीही धूमधडाका न करता साधेपणाने वधूला घेऊन गेली.
अनेकदा विवाह सोहळ्यांमधील अवाजवी आणि दिखाऊ खर्चामुळे सर्वसामान्यांवर आणि कुटुंबावर कर्जाचा मोठा डोंगर होतो.या विवाहाने समाजासमोर एक अत्यंत सकारात्मक आणि प्रेरणादायी संदेश दिला आहे.विवाहातील अनावश्यक खर्चाला फाटा देत घेतलेल्या या स्तुत्य निर्णयामुळे संपूर्ण माजलगाव तालुक्यातून आणि गावकऱ्यांकडून या विवाह सोहळ्याची व नवविवाहित जोडीची जोरदार स्तुती केली जात आहे.
समाजासमोर एक नवा आदर्श वस्तुपाठ निर्माण केल्याबद्दल या दोन्ही कुटुंबांचे सर्वत्र कौतुक होत आहे.या साध्या पद्धतीत झालेल्या झटपट विवाहासाठी मौलाना हाफिज कुद्दूस खान यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.











