सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सावर्डे येथील 'सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च' (SIMRS) या महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. मुंबईतील नेस्को (NESCO), गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन्स सेंटरमध्ये पार पडलेल्या राज्यस्तरीय सोहळ्यात महाविद्यालयाला 'बेस्ट कॉलेज - रत्नागिरी जिल्हा' या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
’द टाइम्स ऑफ इंडिया’ (The Times of India) आणि ‘ईएसएफई’ (ESFE – Education Supply & Franchise Expo) यांच्या संयुक्त विद्यमाने ८ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या दिमाखदार सोहळ्यात महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अश्विनी मिथुन पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवणे अत्यंत कठीण व आव्हानात्मक काम होते. यासाठी सह्याद्री एमबीएच्या वतीने प्राचार्या डॉ. अश्विनी पाटील यांनी अर्ज (Nomination) दाखल केला होता. प्राथमिक छाननीनंतर त्यांची दुसऱ्या फेरीसाठी निवड झाली, ज्यामध्ये महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता, पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या संबंधित कागदपत्रांची सखोल तपासणी (Document Verification) करण्यात आली. त्यानंतर तिसऱ्या फेरीत तज्ज्ञ समितीद्वारे डॉ. अश्विनी पाटील यांची वैयक्तिक मुलाखत (Personal Interview) घेण्यात आली. सर्व निकष यशस्वीपणे पार केल्यानंतर सह्याद्री एमबीएचे अधिकृत नामांकन जाहीर करण्यात आले आणि ८ ऑक्टोबर रोजी त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.
हा पुरस्कार केवळ एका जिल्ह्यापुरता मर्यादित नसून, संपूर्ण कोकण विभागात व्यवस्थापन शिक्षण (MMS/MBA) क्षेत्रात सह्याद्री एमबीएने केलेल्या उल्लेखनीय व गुणात्मक कार्याची ही अधिकृत पावती आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त ‘डिजिटल नेक्सस’ सारख्या सुविधा पुरवून १००% रोजगारक्षम बनवण्यातील महाविद्यालयाचे योगदान या पुरस्कारामागील मुख्य आधार ठरले आहे.
हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना डॉ. अश्विनी पाटील म्हणाल्या, “हा गौरव म्हणजे सह्याद्री शिक्षण संस्थेची दूरदृष्टी, अध्यक्ष व आमदार शेखर निकम सर यांचे खंबीर मार्गदर्शक नेतृत्व, कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम यांचे कुशल व्यवस्थापन, सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमांचे फळ आहे. भविष्यातही उद्योगजगताच्या गरजेनुसार गुणवंत व सक्षम व्यवस्थापक घडवण्यासाठी आमचे कॉलेज कटिबद्ध राहील.”
या उल्लेखनीय यशोशिखराबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व आमदार शेखर निकम, कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, सचिव महेश महाडिक, संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व संपूर्ण शैक्षणिक वर्तुळातून डॉ. अश्विनी पाटील व SIMRS टीमवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.











