ज्ञानेश्वर सावळे/ मुक्ताईनगर
मुक्ताईनगर -येथे आमदार मा. श्री. चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या निवासस्थानी त्यांच्या उपस्थितीत रावेर, मुक्ताईनगर व बोदवड आगारप्रमुखांची बैठक घेण्यात आली. याप्रसंगी उपस्थित राहून खालील विषय मांडले.
शेगाव येथे श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविक भक्तांची सोय व्हावी, यासाठी ता. रावेर येथून निंबोल, ऐनपूर, तांदलवाडी, मार्गे मुक्ताईनगर व मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा, कुऱ्हा, खांडवी, नांदुरा मार्गे शेगावपर्यंत बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
या बैठकीत रावेर बस आगारासंदर्भात प्रवासी, नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बस फेऱ्यांच्या अनियमिततेवर लक्ष – अनेक बस फेऱ्या वेळेवर येत नसणे, अचानक फेऱ्या रद्द करणे आणि रद्द केलेल्या फेऱ्यांची प्रवाशांना वेळेवर सूचना न देणे, आगारातील टेलिफोन बऱ्याचवेळा बंद येणे, यामुळे नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असल्याच्या तक्रारी मांडण्यात आल्या.
प्रवाशांच्या सुविधांबाबत सूचना – रावेर बस आगारातील स्वच्छतागृहांची अस्वच्छता तसेच चौकशी कक्षातील कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांशी होणाऱ्या अयोग्य वर्तनाबाबतही चर्चा करण्यात आली. यापुढे अशा तक्रारी उद्भवणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या स्पष्ट सूचना आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांनी संबंधित आगारप्रमुखांना दिल्या.
शेगाव जाण्यासाठी सदरील मार्गावरील बससेवा सुरू झाल्यास परिसरातील भाविकांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांचा प्रवास अधिक सोयीस्कर होण्यास मदत होईल.
यावेळी शिवसेना प्रमुख श्री. नवनीत पाटील, रावेर विधानसभा BLA-1 राहुल पाटील गुरुजी, युवासेना उपजिल्हाप्रमुख तुषार कचरे, रावेर लोकसभा सोशल मीडिया संपर्कप्रमुख दिपक वाघ, तसेच रावेर, मुक्ताईनगर व बोदवड आगारांचे प्रमुख मंडळी उपस्थित होते.









