तुमसर: सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेचे सहकार अधिकारी श्रेणी – १ राजेश्वर चोरघडे ३७ वर्षे ११ महिने प्रदीर्घ आणि उल्लेखनीय सेवेनंतर ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. आपल्या कार्यकाळात चोरघडे यांनी सहकार क्षेत्रात प्रामाणिकता, कर्तव्यनिष्ठा आणि समर्पणाचा आदर्श प्रस्थापित केला. सहाय्यक निबंधक कार्यालयात त्यांनी साडेतीन वर्षे मनःपूर्वक सेवा बजावत सहकार क्षेत्रात योगदान दिले.
या विशेष प्रसंगी चोरघडे यांचा सत्कार समारंभ सहाय्यक निबंधक कार्यालयात आयोजित करण्यात आला. या समारंभात सहाय्यक निबंधक विलास देशपांडे, सहकार अधिकारी गिरीश धोटे, मुख्य लिपिक सुधीर शेंद्रे, सहाय्यक सहकार अधिकारी बी.टी. कोहे, कनिष्ठ लिपिक समीर शेख आणि मुलचंद नागपूरे यांनी चोरघडे यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला.
सहकार क्षेत्रातील अधिकारी गटसचिव, पतसंस्थांचे पदाधिकारी, मजूर संस्थेचे प्रतिनिधी व इतर पदाधिकाऱ्यांनीही चोरघडे यांचा सन्मान करून त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सेवानिवृत्तीच्या या भावनिक क्षणी उपस्थितांमध्ये एक विशेष वातावरण निर्माण झाले, आणि चोरघडे यांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले.
चोरघडे यांच्या कर्तव्यदक्ष सेवेमुळे सहकार क्षेत्रात त्यांचे योगदान कायम प्रेरणादायी राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
Discussion about this post