महिला शेतकरी मेळावा संपन्न
सारथी महाराष्ट्राचा वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी
स्त्रीशक्तीच्या शिक्षणाचे दरवाजे उघडणाऱ्या आणि ज्यामुळे त्यांचे जीवन समृद्ध करणाऱ्या क्रांतीज्योती सावत्रीबाई फुले यांचे कार्य आणि त्यांचे जीवन आपणा सर्वासाठी दिशादर्शक आणि आदर्श असून त्यांच्या जीवनातून प्रोत्साहन घेऊन प्रत्येक महिलेने समाजाचे प्रतिनिधित्व करणे आवश्यक आहे. भारतातील शेती हि मुख्यत: महिला शेतकऱ्यांच्या अविरत कष्टावर अवलंबून आहे. महिला शेतकऱ्यांना शेतीमध्ये अनेक काबाड कष्ट करावे लागतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसतात. यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि अन्य विद्यापीठांनी महिला शेतकऱ्यांचे काबाड कष्ट कमी करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केलेले आहे. त्या सर्व तंत्रज्ञानाची माहिती महिला शेतकऱ्यांनी घेऊन त्यांचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर द्वारे दिनांक ०३ जानेवारी, २०२५ रोजी आयोजित महिला शेतकरी मेळावा चे अध्यक्षीय मार्गदर्शन करताना कृषि तंत्र विद्यालय, छत्रपती संभाजीनगरचे प्राचार्य डॉ.पंडित मुंडे यांनी व्यक्त केले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथे महिला शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून श्रीमती. मधुरिमा जाधव, सहायक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, छत्रपती संभाजीनगर, डॉ.गीता आचार्य, उद्योजिका तथा सामाजिक कार्यकर्त्या, छत्रपती संभाजीनगर यांची उपस्थिती होती. तसेच यावेळी डॉ.अनिता जिंतूरकर, कार्यक्रम समन्वयक, केव्हीके, छत्रपती संभाजीनगर, विषय विशेषज्ञ इंजि.गीता यादव, डॉ.संजूला भावर, डॉ.बस्वराज पिसुरे, कृषि उद्योजिका श्रीमती.कालिंदा जाधव, श्रीमती. छायाताई साबदे,श्रीमती.निलीमाताई, सावित्रीबाई समाज एकात्म मंडळ च्या श्रीमती देशमुख व महिला शेतकरी मोठ्या संख्यने उपस्थित होते.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. डॉ अनिता जिंतूरकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी मार्गदर्शन करताना श्रीमती. जाधव म्हणाल्या कि, समाजातील प्रत्येक क्षेत्रात महिलांनी नेतृत्व करणे गरजेचे आहे. स्वतःला कमी न समजता आणि केवळ ठराविक चौकटीत न राहता बाहेर येऊन निडरपणे सर्व क्षेत्रात पुढे येऊन कार्य करण्याची गरज आहे. मुलींनी उच्च शिक्षण घेऊन समृद्धी साधावी आणि महिलांनी देखील कृषि आणि ग्रामीण विकासाच्या प्रत्येक कार्यक्रमात अत्यंत उत्साहात सहभागी व्हावे. महिला शेतकऱ्यांना मत्स्य व्यवसायात देखील खूप मोठ्या प्रमाणावर संधी असून याकडे महिलांनी ओळावे आणि यासाठी शासनाचा मत्स्य व्यवसाय विभाग सदैव आपल्या पाठीशी असेल.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.आचार्य यांनी महिलांचे मानसिक, शारीरिक व आर्थिक सक्षमीकरण यावर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या कि महिला याच समाजाचा कणा आहेत. त्यामुळी हा कणा सदैव ताठ आणि कार्यरत असणे गरजेचे आहे. समाजातील प्रत्येक महिला ही सक्षम, संपन्न आणि समृद्ध झाली पाहिजे आणि यासाठी सर्वांनी मिळून कार्य करण्याची गरज आहे. महिलांचे सबलीकरण करण्यासाठी महिला उद्योजिका घडणे आवश्यक आहे. यासाठी आसपासचे वातावरण, शिक्षण, अनुभव, प्रयोगशीलता आणि बाहेरच्या जगाशी संवाद या पंचसुत्रीची आवश्यकता आहे. या पाचही बाबींमध्ये महिला शेतकऱ्यांनी आपला विकास घडून आणला तर नक्की महिला सक्षम होण्यास मदत होणार आहे.

यावेळी केव्हीके, छत्रपती संभाजीनगर द्वारे प्रशिक्षित महिला उद्योजिका श्रीमती. श्रीमती.कालिंदा जाधव, श्रीमती. छायाताई साबदे, श्रीमती.निलीमाताई यांनी आपल्या व्यवसाय उभारणी व उद्योजिका होण्यापर्यंतचे अनुभव सर्व उपस्थितांना सांगितले. यावेळी केव्हीके मार्फत त्यांच्या सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ.बस्वराज पिसुरे यांनी केव्हीकेद्वारे राबण्यात येणारे उपक्रमाबद्दल माहिती सांगून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर डॉ.संजूला भावर यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री.सतीश कदम,श्री.जयदेव सिंगल, श्री.जयदीप बनसोडे यांनी नियोजन केले.
Discussion about this post