सांगोला : ( तालुका प्रतिनिधी धोंडीराम घाडगे )
तालुक्याला सातत्याने दुष्काळाच्या झळा बसत असल्याने गंभीर चारा टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यातून मुरघास तंत्रज्ञानाचा हुकमी पर्याय समोर आल्याने जनावरांसह दुग्ध व्यवसाय वाचला आहे. सांगोला तालुक्यातील शेतकरी आता शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे वळला आहे. पशुपालन व दुग्ध व्यवसायामध्ये हिरव्या चाऱ्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सर्वच शेतकऱ्यांना हिरवा चारा उपलब्ध होत नसल्याने आता मुरघास बनवण्या कडे शेतकरी वळला असल्याचे चित्र दिसत आहे. मुरघास तंत्रज्ञान वापरामुळे असंख्य शेतकऱ्यांना दुष्काळात चाऱ्याचा आधार मिळाला. पावसाळ्याच्या दिवसात उपलब्ध असलेला हिरवा चारा कुट्टी करून त्यावर प्रक्रिया करून मुरघास बनवून साठवला जातो. त्यामुळे दुष्काळी भागातील दुग्ध व्यवसायिकां साठी मुरघास वरदान ठरत आहे. शेतकऱ्यांचा फायदा होत असून, मुरघास बनवण्या कडे त्यांचा कल वाढला आहे.
दुष्काळी तालुका अशी ओळख असली तरी जिल्ह्यात दुग्ध व्यवसायात सांगोला तालुक्याचे महत्त्वाचे स्थान आहे. सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी अलीकडील आठ ते दहा वर्षांपासून चाराटंचाई वर मात करण्यासाठी मुरघास तंत्रज्ञान वापरले असून त्याला आता व्यापक स्वरूप प्राप्त होत आहे. मुरघास तंत्रज्ञानात सुधारित व यांत्रिकीकरण आले आहे. यात
जनावराच्या चाऱ्यासाठी मुरघास तंत्रज्ञानाचा वापर करीत असल्याने दूध उत्पादनात पंधरा ते वीस टक्के वाढ झाली आहे. मुरघास कोणत्याही हंगामात बनविता येते. उन्हाळ्यात मुरघास खाऊ घालून दुभत्या जनावरांची दूध उत्पादन क्षमता टिकवून ठेवता येते. शिवाय, जनावरांचे आरोग्य नीट राखण्यास मदत होते. तसेच चाऱ्याची बचत होते. मुरघास बनवून ठेवला की, रोजच्या रोज चारा आणण्याच्या कामाची व वेळेची बचत होते. कुट्टी करून मुरघास बनवत असल्याने चाऱ्याची नासाडी थांबविणे शक्य होते. सकस चारा मिळाल्याने जनावरांच्या अनेक अडचणी कमी झाल्या आहेत. मा.आनंदा साळुंखे पाटील,
चेअरमन सांगोला.
चाऱ्यातील कापणी केलेल्या आर्द्रता ६० ते ७० टक्क्यांवर आणण्यासाठी वैरण सावलीत वाळविली जाते. चाऱ्याची यंत्राद्वारे कुट्टी केली जाते. हिरवा चारा म्हणजे ग्रामीणभागात सगळीकडे मका पिकाला जास्त प्राधान्य दिले जात आहे. योग्यवेळी मकेपासून बंदिस्त व हवाबंद मोठ्या पिशवीत कुट्टी करून साठवून ठेवलेल्या चाऱ्यात उपयुक्त अशा रासायनिक प्रकिया घडून येतात. आंबविलेल्या चाऱ्यातील पोषणमूल्यामध्ये काहीही घट न होता चारा स्वादिष्ट आणि चवदार बनतो. यालाच मुरघास म्हटले जाते. मुरघासासाठी चारा फुलोऱ्यात असतानाच कापणी करतात. मुरघास तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चाऱ्यामध्ये साधारणतः ६० टक्के ओलावा लागतो. चारा सुकल्यावर कुटीच्या साह्याने त्याचे अर्धा ते एक इंचापर्यंत बारीक तुकडे केले जातात व प्रकियेसाठी मोठ्या पिशवीत भरून किमान २१ दिवस हवाबंद ठेवले जातात. त्यानंतर तो जनावरांना घालण्यास सुरुवात करीत असतात.
जनावरांना बाराही महिने हिरवा चारा देणे शक्य नसते. त्यामुळे तो शास्त्रशुद्ध पद्धतीने साठविणे आवश्यक आहे. दूध उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांना जनावरांचे दूध उत्पादन न घटता नियमित मिळायला हवे असेल, तर त्यांना रोजच्या आहारात हिरवा चारा देणे आवश्यक असल्याने मुरघासाचा उपाय आहे. मका, ज्वारी, बाजरी, नेपियर, गिनी गवत आदींचा वापर करताना त्यातील प्रथिने, शुष्क पदार्थ यांचे प्रमाण तपासावे लागते. मजबूत पॉलिप्रॉपिलीनच्या व आतील बाजूला १ मिमी. जाडीच्या प्लॅस्टिक बॅगेचाही बऱ्यापैकी वापर होत आहे. त्यात ५०० ते एक हजार किलोपर्यंत मुरघास भरला जातो. मुरघासामुळे चाराटंचाईवर मात करता येते हे सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. यामध्ये वापरली जाणारी प्लॅस्टिक बॅग यूव्ही स्टॅबिलाइज्ड असल्याने बाहेरील वातावरणाचा त्यावर परिणाम होत नाही..
Discussion about this post