

भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम..
” हेडाम” कादंबरी एका कार्यक्रमात लेखक नागु विरकर यांनी मला सप्रेम भेट दिली तेव्हा अभिप्राय लिहा, असे सांगायला विसरले नाहीत, त्या दिवसापासून झपाटल्यासारखे एक दोन दिवसात कादंबरी वाचून काढली,नागु विरकर हे आमचे समाज बांधव.संघर्ष हा आमच्या धनगर समाजाच्या अगदी पाचवीला पूजलेला आहे, पूर्वी ही आणि आता ही,मेंढपाळाच्या जीवनातील हाल आप्तेष्टांना नागु विरकरांनी अगदी त्यांच्या अस्सल ग्रामीण भाषेत मांडल्या आहेत, माणदेश हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो, गावाला टॅंकरने पाणी पुरवठा चालू असतो,” हेडाम” कादंबरी वाचताना चाळीस पन्नास वर्षांपूर्वीचे जुनेच शब्द पण नव्याने वाचायला मिळाले, गावाकडे असताना या शब्दांचा मला ही परिचय होता,पण मुंबई महानगरीत पोट भरण्यासाठी आल्यावर मात्र हे शब्द माझ्या दैनंदिन जीवनातून गायब झाले,हरवले होते,आमचे मित्र नागु विरकर यांच्या ” हेडाम” कादंबरी वाचताना पुन्हा या शब्दांची ओळख नव्याने झाली .ते शब्द असे आहेत,आवंदा, बक्कळ,बरबाट,कोरड्यास,करडू,जितराब,आवशी,नेणतं,बाळुत्यात,प्वाटभर,लट्यातोळ, वगैरे वगैरे.कादंबरी वाचता वाचता डोळे भरायचे व कागदावरील अक्षरे अश्रूत तरंगत राहायची असे अनेक वेळा झाल्याने कादंबरी वाचायला थोडा उशीर झाला.पंढरपूर येथे नदी पात्रात वाळूत,पाठीसकट लेखक घोड्यांच्या टापा जवळ पडलेला प्रसंग लेखकाने लेखणीतून जीवंत करून डोळ्यासमोर उभा केला आहे,मेंढरं मरुनी म्हणून,मेंढरांना वर्षं भर रोगराई होऊ नये यासाठी जत्रेत बकरी कापली जात, लक्ष्मी आई देवीची खणा नारळाने वटी भरली जायची, गोडवा पुरण पोळीचा निवद केला जात असे,मारकुंड्या केंगार गुरुजीचे किस्से, त्यांच्या माराच्या भितीने अनेक मुलांनी शाळा सोडल्या.पितळीने चहा पिणे,पितळीने बरबाट पिणे,हे प्रसंग लेखकाने डोळ्यासमोर उभे करुन मला ही माझ्या बालपणीच्या आठवणी जाग्या करून दिल्या आहेत.नातेपुते ( हे माझे ही मूळ गाव) गावातील गुरुजी आबाला बोलले,” खिलारी पोरांना शाळा शिकविली पाहिजेती,असं वनं वनं तुमच्या माघ फिरुन काय फायदा, कष्टाचं जीवन तुम्ही जगता,या लेकरांच्या वाट्याला कशाला आणता, आता जग बदललेले आहे, शिक्षण तिसरा डोळा आहे,पोरा बाळांना शिकवून कुठेतरी सुखाचं स्थिर जीवन जगू द्या ” गुरुजी चे हे मत आबाला पटलं, लेखकाला तिसरी पर्यंत थोडं अंकाची, अक्षरांची वळख हुती, घोड्यावर बसून पुढच्या गावाला जाताना सडकेच्या कडंन मैलाच्या दगडावरची व गावाची नावे वाचता येत हुती,पण किलो मीटर काय असते ते कळतं नव्हतं, चालू एसटी चा बोर्ड वाचण्याचा प्रयत्न करीत असतानाच एसटी निघून जायची, गावातून घोड्याचा तांडा चालल्यावर उभ्या वाहनांवरची नावे ,दुकानावरच्या पाट्या वाचण्याचा प्रयत्न करत हुतो, नव्हे तो मला छंदच लागला हुता, शिक्षणासाठी लेखकाचा प्रामाणिक प्रयत्न होय.धुळोबाच्या जतरेत गाण्याकडे लक्ष वेधून घेते.
” आवशी मांडलं सुंबरान,
पाहट पडलं सपायान,
देवा या धुळाजीनं दिये देववानं
वचयान”
……………
” मेंढ्या बयाच्या पसार्याने सर्व डोंगर साकाळला,
माझा नेणतं बाळ,पासार्या किकळला,
सारा शिवार घनानला,
……. अन् सुंबरान मांडलं/भोळ्या माझ्या देवाला,
बिरु तान्ह्या बाळाला/आरवाडी राजाला/
वगैरे वगैरे लोकगीते,देवाची गाणी लेखकानी कादंबरीत नमूद करुन आपली पारंपरिक लोककलेची आठवण करून दिली आहे.हेडाम कादंबरी महाराष्ट्र भर वार्याच्या वेगाने घोडदौड करीत आहे,ही अतिशय आनंदाची बाब आहे,चौथी आवृत्ती निघेपर्यंत हेडाम कादंबरीवर १६ पुरस्काराचा वर्षाव झाला आणि या पुढे ही होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.प्रसंगाचा क्रम, निवेदन पध्दत, दोन दिवसाचा प्रेम प्रसंग , यातील लोकगीते, सुंबरान गाणी सर्व काही वाचनीय आहे, प्रत्येकाने ही कादंबरी वाचून संग्रही ठेवावी, अशीच आहे,
या कादंबरीच्या अनेक आवृत्त्या निघो,ही सदिच्छा..
भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम मोबाईल 8652305700
Discussion about this post