



श्री विवेकानंद प्राथमिक विद्यामंदिर शाळेत फूड फेस्टिवलचे आयोजन अन लाखो रुपयांची उलाढाल..
पाथर्डी प्रतिनिधी : विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणातून व्यवहार ज्ञान प्राप्त होणे आवश्यक असते. विद्यार्थ्यांना विविध ज्ञानाची भूक भागवण्यासाठी विविध उपक्रम शालेय स्तरावर राबवणे ही काळाची गरज आहे यासाठी विद्यालयात फूड फेस्टिवलचे आयोजन केल्यामुळे विद्यार्थ्यांना कृतीयुक्त व्यावहारिक ज्ञान प्राप्त झाले असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. बी. ए. चौरे यांनी व्यक्त केले.
पार्थ विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री विवेकानंद प्राथमिक विद्यामंदिर पाथर्डी या शाळेत संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड यांच्या संकल्पनेतून गेल्या पंधरा वर्षापासून आनंदबाजार (फूड फेस्टिवल) हा उपक्रम अविरतपणे सुरू आहे. विद्यार्थ्यांना कृतीयुक्त ज्ञान प्राप्त व्हावे,विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान आकलन व्हावे. तसेच विद्यार्थ्यांना विविध वस्तूंची देवाण-घेवाण करता यावी. विद्यार्थ्यांमध्ये बोलण्याची कला विकसित व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
आनंदबाजारचे उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी बाबुजी आव्हाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. ए.चौरे, समन्वयक ज्ञानेश्वर गायके,मुख्याध्यापिका अनुजा कुलकर्णी, प्रा. ब्रह्मानंद दराडे, संपत घारे,अभिजीत सरोदे, दीपक राठोड व बहुसंख्येने पालक माता भगिनी तसेच शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या महोत्सवामध्ये शाळेतील ४१८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन जवळपास २०३ विविध पदार्थांचे स्टॉल विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी ठेवले होते. या बालआनंद मेळाव्यात भाजीपाला, किराणा दुकान, मिठाईचे पदार्थ, खाद्यपदार्थ,पाणीपुरी, फळ विक्रेते, तसेच शेतातील काही भाज्यांचे विद्यार्थ्यांनी स्टॉल सजवले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी एकूण १ लाख ४५ हजार २३० रुपयांची कमाई केली. आनंद बाजारसाठी पालकांनी उपस्थित राहून भरपूर प्रतिसाद दिला. खवय्येगिरांनी फूड फेस्टिवलचा मनमुराद आनंद लुटला.पालकांनी उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
उपक्रम यशस्वीतेसाठी जयश्री एकशिंगे, मनीषा गायके, आशा बांदल,राधिका सरोदे, ज्योती हंपे,कीर्ती दगडखैर, विद्या घोडके, ऋषिकेश मुळे,बाळू हंडाळ, आदीनाथ फाजगे यांनी परिश्रम घेतले..
Discussion about this post