


इवले से रोप लाविले द्वारी तयाच्या वेलू गेला गगनावली 12 मार्च 1951 या दांडी यात्रेच्या वर्धापन दिना चा मुहूर्त साधून कै मा डॉ देवरामभाऊ नारखेडे यांनी व शैक्षणिक प्रेमी ग्रामस्थांनी साळवे, ता. धरणगाव, जि. जळगाव. या आपल्या गावात शैक्षणिक प्रगतीची मुहूर्तमेढ रोऊन ग्राम सुधारणा मंडळ व साळवे इंग्रजी विद्यालयाची स्थापना केली.
त्यावेळी शाळेत फक्त दहा-बारा विद्यार्थी सुरुवातीला होते. सुरुवातीस काही दिवस ती शाळा गावातच भरत असे, नंतर हळूहळू गावाबाहेर प्रशस्त जागा घेऊन श्रमदानाने व लोकवर्गणीतून इमारत बांधकामात सुरुवात केली. तिचे आजचे भव्य दिव्य स्वरूप आपल्याला डोळ्यासमोरच दिसत आहे. कै. देवरामभाऊंची शिक्षणाविषयीची तळमळ पाहून हे दिसून येते. तथापि वयाच्या ९९व्या वर्षापर्यंत देखील ते विद्यार्थी प्रिय होते. शिक्षण क्षेत्रातील तज्ञ म्हणून त्यांनी पी एच डी संपादन केली होती. साळवे इंग्रजी विद्यालयात सुरुवातीस आठवी ते अकरावीचे वर्ग होते. तेथे आता पहिली ते बारावी व किमान कौशल्य, तांत्रिक विभाग असे सर्व विभागातून मिळून सुमारे 550 विद्यार्थी या काळात शिक्षण घेत आहेत.
त्यात प.पू. सानेगुरुजी प्राथमिक सेमी इंग्रजी विद्यालय, साळवे इंग्रजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, आणि किमान कौशल्य विभाग.हे विभाग सुरू आहेत. येथे फक्त साळवेच नव्हे तर खर्दे, भांबर्डी, ऊखळवाडी, कामतवाडी, निशाने, नांदेड, साखरे, कंडारी, निमझरी व नारणे या ग्रामीण भागातून, पंचक्रोशीतून विद्यार्थी शिक्षण घेत होते. गेल्या 75 वर्षापासून चेअरमन व संचालक मंडळ सतत प्रयत्न करून शैक्षणिक विकासात खतपाणी घालत आहेत.
आज विद्यालयाच्या परिसरात टोलेजंग अशा तीन भव्य इमारती असून त्यात सुसज्ज अशी विज्ञान प्रयोगशाळा, डार्करूम, ड्राइंग हॉल, स्वतंत्र शिक्षक कक्ष, शिक्षिका कक्ष, मुख्याध्यापक कक्ष, संगणक कक्ष, ग्रंथालय व किमान कौशल्याचे वर्कशॉप आणि भव्य असा सुवर्णस्मृती हॉल अशा विविध सोयी आहेत. मजबूत व सुदृढ आरोग्यासाठी सुसज्ज अशी व्यायाम शाळा आहे.
शिक्षक विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, मानसिक शारीरिक, व सांस्कृतिक विकासासाठी प्रयत्नशील असून एस एस सी साठी व्याख्यानमाला, प्रश्नमंजुषा, सराव परीक्षा, वकृत्व स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, आनंद मेळावा व विज्ञान प्रदर्शन वगैरेतून विद्यार्थ्यांचा सहभाग सतत वाढवीत असतात. गेल्या 75 वर्षापासून एस एस सी चा व चाळीस वर्षापासून एच एस सी चा निकाल 85% च्या पेक्षा जास्त आहे एस एस सी नांदेड केंद्रात पहिला येण्याच्या मान सतत आमच्या विद्यालयाचा आहे, ही गोष्ट नम्रपणे नमूद करू इच्छितो.
या जडणघडणीत वाटा आहे तो संस्थापक व माजी ऑनररी मुख्याध्यापक कै डॉ देवरामभाऊ, पै रहीम सर, कै सापुरीकर सर, राज्य पुरस्कार प्राप्त हाजी पै शब्बीर सर, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त कै चारुदत्त नारखेडे सर, कै. ओंकारभाऊ नारखेडे, कै. नेहेते सर, श्री कोळंबे सर, कै आर एन बऱ्हाटे सर, याशिवाय आजी-माजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचा आणि आजचे मुख्याध्यापक व शिक्षक देखील शालेय शैक्षणिक प्रगती बरोबरच व्यापक व भरीव शिक्षक प्रशिक्षणात तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर देखील सदैव यशस्वी आहेत. त्यात प्रामुख्याने मुख्याध्यापक श्री एस डी मोरे, श्री व्ही के मोरे, श्री एस पी तायडे सहभागी आहेत.अभिमानाची बाब म्हणजे मागील वर्षी आमच्या विद्यालयाला “मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा” या स्पर्धेत तालुकास्तरीय दुसरे बक्षीस एक लाखाचे मिळाले, आणि विभागीय पातळीवर क्रीडा शिक्षक व्ही एस कायंदे यांनी राज्यस्तरीय झालेल्या क्रीडा स्पर्धेत नाशिक येथे दुसरे बक्षीस प्राप्त केले. शिक्षकांचे समवेत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचांही वाटा तितकाच महत्त्वाच्या आहे. आणि आम्हाला प्रेरणा देणारे संस्थेचे सर्व संचालक मंडळ हे देखील महत्त्वाचे आहेत.
विद्यमान चेअरमन गिरीश नारखेडे, खजिनदार डॉ चंद्रकांत नारखेडे, सचिव श्री रमेशदादा बोरोले, शालेय समितीचे चेअरमन डॉ शशिकांत नारखेडे, आणि सर्व संचालक मंडळ यांचे संस्था व विद्यालयावर कटाक्षाने लक्ष असते.
12 मार्च 1951 या शुभ दिनी सुरू झालेल्या या आमच्या विद्यालयाचा व संस्थेचा यंदा हा अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने या संस्थेचा शाळेच्या इतिहास व प्रगतीच्या आलेख उंचावला आहे. या सर्व प्रगतीत संस्थेचे, शाळेचे व गावाचे सर्व घटक समाविष्ट आहेत, या सर्वांबद्दल संचालक मंडळाच्या वतीने मी कृतज्ञता व्यक्त करतो. अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सांगायचे झाले तर यंदाचे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करताना त्याची चिरंतन व प्रेरणादायी स्मृति सर्वांसमोर राहावी या उद्देशाने वर्षभर विविध कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत.
संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात सुवर्ण स्मृती या भव्य सभागृहासाठी सुमारे दहा लाखाचा निधी संकलन करण्याचे उद्दिष्ट ठरवले होते. संचालक मंडळ, आजी व माजी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व माजी विद्यार्थी यासर्वांनी स्वेच्छा योगदान कबूल केले व दिले. तरीही महत्त्वाचा घटक म्हणजे विद्यार्थी त्यात काही माजी विद्यार्थ्यांचा अनुभव अतिशय बोलका आहे.मुंबई येथे राहणारे काशिनाथ इंगळे यांचे कडे देणगी संदर्भात गेले असता त्यांची भेट न होऊ शकल्याने फक्त माहिती पत्रक देऊन 28 तारखेस येतो असे सांगून आले. पुन्हा 28 तारखेस गेले व लिपिक कै. अशोक बोरोले गेलो. तेव्हा आम्हाला पाहून त्यांना झालेला आनंद अवर्णनीय होता. सर्व आदरातित्थे त्यांनी केले. यानंतर त्यांनी चेक लिहायला घेतला तर ते एक आकड्याच्या वर किती शून्य देतात हे कै.अशोक बोरोले पहात राहिले. एकावर चार शून्य देऊन रू.१०,०००/- (रुपये दहा हजार) चा चेक पाहून आम्ही अचंबीत झालो. इतके या शाळेवर त्यांचे प्रेम होते.मा. भवरीलाल जैन सध्या सिन्नरला असतात. त्यांची उलाढाल दरवर्षी कोट्यावधींची करतात त्यांनी देखील एकदाच निवेदन केल्यावर रू. 11000 , ( रुपये अकरा हजार ) चा चेक विनम्रपणे दिला. श्री बंडू मांगो अत्तरदे हे येथील एक कष्टकरी शेतकरी परंतु मुलांना शिकविले ती शिकली पुढे यशस्वी उद्योजक झाली आज श्री बंडू नाना व त्यांची मुले यांची सामायिक प्रॉपर्टीत कोट्यावधींचे घरात आहे, पण दातृत्व ही तसेच त्यांचे चिरंजीव श्रीहरी बंडू अत्तरदे व श्री मुरलीधर बंडू अत्तरदे व श्री ज्ञानदेव बंडू अत्तरदे यांनी देखील भरपूर योगदान दिले. व आवश्यकता भासल्यास आणखी देऊ असे आश्वासन दिले. नाशिकला राहात असलेले उद्योजक साळव्याचे मितभाषी सुपुत्र श्री प्रकाश खुशाल बाविस्कर हे आमचे माजी विद्यार्थी आज सातपूर एमआयडीसी मध्ये त्यांचे भव्य दोन युनिट कार्यरत आहेत. त्यांचे मातृभूमी विषयी असलेले प्रेमही तसेच त्यांनी स्वतः रू 11000 चे भव्य योगदान दिले. शिवाय ज्यावेळी मासिकला शिष्टमंडळ गेले तेव्हा स्वतः कौटुंबिक आदरातिथे ने वागवून स्वतःच्या पैसा, वेळ, गाडी, पेट्रोल सर्व खर्च करून निधी जमवण्यासाठी सक्रिय सहभाग दिला, या लोकांचे प्रेम यातून व्यक्त होणे, त्यांचे ऋण शब्दांनी व्यक्त करणे शक्य होणार नाही. असे माझी चेअरमन यांनी लिहून ठेवले आहे. हा अनुभव एका बाजूला तर काही वेगळे ही अनुभव येतात आपल्या शाळेतून क ख ग घ शिकून गेलेली मुले त्यांनी आपल्या मुलांना एबीसीडी शिकवली ती मुले आज भारतात विविध भागात नव्हे तर प्रदेशात देखील राहुल भरपूर अर्थाजन करीत आहेत. या संस्थेच्या विद्यालयातील विद्यार्थी आजपर्यंत शिक्षक, मेकॅनिक, वकील, डॉक्टर, इंजिनिअर, देशाचे सेवेत सैनिक, उद्योजक व नेते घडत आले आहेत ते आपापल्या क्षेत्रात नाव व त्याची प्रतिष्ठा संपादन करून आहेत. या सर्वांच्या व आजच्या शिकत असलेल्या आणि याही पुढे शिकण्यास येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आज या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आमच्या शाळेची व संस्थेची प्रगती व भरभराटी होण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना करून माझे दोन शब्द संपवतो..
Discussion about this post