
गणेश राठोड,
तालुका प्रतिनिधी उमरखेड..
पिंपळवाडी तांडा, ता. उमरखेड – शिक्षण नसतानाही आपल्या मुलांच्या भविष्याची उज्ज्वल स्वप्ने पाहणाऱ्या आईच्या ध्येयसिद्धीची कहाणी नक्कीच प्रेरणादायी आहे. अशाच एका संघर्षशील आणि जिद्दी मातृत्वाचा गौरव करण्याची संधी पिंपळवाडी तांडा (ता. उमरखेड) येथील सावित्रीबाई राम राठोड यांनी दिली आहे. स्वतः शिक्षण घेऊ न शकलेल्या या मातेनं आपल्या तीनही मुलांना उच्चशिक्षित करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भक्कम पाया रचला आहे. महिला दिनानिमित्त या कर्तृत्ववान मातेला विशेष सन्मान !
शिक्षण नसतानाही मुलांसाठी मोठे स्वप्न पाहिले :
सावित्रीबाई राठोड या लहानपणापासून शिक्षणापासून दूर राहिल्या. परिस्थितीने त्यांना शाळेच्या दारातही जाऊ दिले नाही, पण शिक्षणाचं महत्त्व त्यांनी नेहमीच जाणलं. स्वतः शिक्षण घेऊ शकल्या नाहीत, पण आपल्या मुलांनी मोठं व्हावं, उच्चशिक्षित व्हावं आणि समाजात सन्मानाने उभं राहावं, अशी त्यांची जिद्द होती. त्याचाच परिणाम म्हणजे त्यांची मुलगी डॉ. आरती राम राठोड हिने वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून डॉक्टर म्हणून आपलं स्थान निर्माण केलं आहे, तर मुलगा संदीप राम राठोड मेकॅनिकल इंजिनिअर आणि प्रदीप राम राठोड सिव्हिल इंजिनिअर म्हणून यशस्वी कारकीर्द घडवत आहेत.
संघर्ष, कष्ट आणि त्याग यांची जिवंत मूर्ती :
गावातील इतर माता-पित्यांसाठी सावित्रीबाई आज एक जिवंत उदाहरण आहेत. आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी त्यांनी अनेक कठीण प्रसंग झेलले. आर्थिक परिस्थिती कमकुवत असूनही त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी कोणतीही तडजोड केली नाही. लहानशा गावात राहून, शिक्षणाशिवायही एक माता आपल्या मुलांना योग्य मार्गदर्शन करू शकते, हा मोठा संदेश त्यांनी दिला आहे.
समाजासाठी नवा आदर्श निर्माण :
सावित्रीबाईंच्या या संघर्षकथेने समाजात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. शिक्षणाशिवायही आईचं मार्गदर्शन मुलांना यशस्वी करू शकतं, हे त्यांनी सिद्ध केलं. त्यांच्या मुलांनी मिळवलेल्या यशामुळे आज त्या केवळ कुटुंबासाठी नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी आदर्श ठरल्या आहेत.
महिला दिनानिमित्त विशेष सन्मान :
महिला दिन हा केवळ सन्मानाचा दिवस नसून, संघर्ष करणाऱ्या, अपार कष्टातून कुटुंब आणि समाज घडवणाऱ्या महिलांचा गौरव करण्याचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई राम राठोड यांचे नाव उज्वलतेने चमकते. त्यांच्या जिद्दीला, त्यागाला आणि अपार कष्टांना सलाम !
“आई म्हणजे मंदिरातलं दीपस्तंभ, जो स्वतः जळतो पण इतरांचे जीवन प्रकाशमान करतो.”
Discussion about this post