
सातारा उपविभागातील अधिकाऱ्यांचा प्रताप, शासकीय ओळखपत्र वापर करण्यास टाळाटाळ..
सातारा (प्रतिनिधी असलम शेख रत्नागिरी) –
राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे कार्यालयीन वेळेत कार्यालयाने दिलेली किंवा राज्य शासनाने दिलेली ओळखपत्र वापरणे बंधनकारक असताना सातारा उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी या नियमाला ठेंगा दाखवल्याचे निदर्शनास येत असून अशा कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकारी कार्यालयाने कारवाई करावी अशी मागणी जिल्ह्यातून जोर धरू लागली आहे परंतु कार्यालय कारवाई करणार का याकडे लक्ष लागून राहिले आहे.!
राज्य शासनाने प्रत्येक सरकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत आपल्या कार्यालयाने किंवा राज्य शासनाने दिलेली ओळखपत्र यांचा वापर करणे बंधनकारक आहे. सातारा जिल्ह्यात या नियमाचे अंमलबजावणी कडक होताना दिसत नव्हती याबद्दल सातारा जिल्ह्यातील जबाबदार अधिकाऱ्यांची काही सामाजिक कार्यकर्त्यांनी भेट घेऊन अधिकारी कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील महसूल विभागाला सक्त सूचना दिलेल्या होत्या.
कार्यालयीन ओळखपत्र वापरण्याबाबत संबंधितांनी सूचना दिल्यानंतर जिल्ह्यातील बहुतेक महसूल कार्यालयात याची स्थानिक अधिकाऱ्यांनी अंमलबजावणीचे निर्देश कर्मचाऱ्यांना दिले होते.
शासकीय ओळखपत्र कार्यालयीन वेळेत वापरण्याबाबत सातारा जिल्ह्यातील महसूल खात्याने वरिष्ठांच्या सूचनाही पाळल्याचे दिसत होते. परंतु सातारा जिल्ह्यातील सातारा उपविभागात येणाऱ्या उपविभागीय अधिकारी कार्यालय सातारा, तहसीलदार कार्यालय सातारा, आणि तहसीलदार कार्यालय जावली या विभागातील काही कर्मचारी हे वरिष्ठांचे आदेश अप्रत्यक्ष डावलत असून राज्य शासनाच्या नियमालाच कोलडांडा दाखवत असल्याचे पाहावयास मिळत आहे. वरिष्ठ सूचना असतानाही हे कर्मचारी ओळखपत्र का घालत नाहीत. असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे. त्यामुळे या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र वापरले नसल्याचे शोधण्यासाठी त्या त्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज पाहून दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावयाची मागणी होत आहे. परंतु सातारा जिल्ह्याची जिल्हाधिकारी याकडे किती गांभीर्याने लक्ष देणार असाही प्रश्न सुजाण नागरिकांना पडला आहे.
अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी :
राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे अधिकारी कर्मचारी ओळखपत्र घालत नसल्याबाबत सातारा उपविभागाचे प्रांत अधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर संबंधितांना सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. परंतु इतर जबाबदार अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता उडवा उडवीची उत्तरे देण्यात आल्याची काही नागरिकांनी सांगितले.
वरिष्ठ अधिकारी महोदय जरा यात लक्ष घालाच..!
सातारा उपविभाग कार्यक्षेत्रात येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना ओळखपत्राबाबत प्रांत अधिकाऱ्यांनी सूचना दिलेल्या असतानाही काही अधिकारी कर्मचारी या सूचनांचे पालन करीत नाहीत. जर प्रांत अधिकाऱ्यांनी आदेश देऊनही ऐकत नसतील तर वरिष्ठ जबाबदार अधिकारी महोदय आपणच याकडे लक्ष घाला. अशी सर्वसामान्य नागरिकांतून मागणी होते..
Discussion about this post