कुरुंदवाड परिसरात मोठ्या उत्साहात होळी सन साजरा….
प्रतिनिधी :-दरिकांत कोळेकर. सारथी महाराष्ट्राचा न्युज.
कुरुंदवाड:- होळीच्या अग्नीत द्वेष,मत्सर,अमंगळ जळू दे…. पुरण पोळीचा गोडधोड जेजीवनात येऊ दे दुःख, चिंता नाहीशी होऊ दे.. आयुष्यात चांगले आरोग्य शांती येऊ दे.. अशी प्रार्थना करीत येथील शहर आणि परिसरात मंगळवारी हुताशनी पौर्णिमेला होळी उत्साहात, पारंपारिक पद्धतीने साजरी झाली.
सायंकाळी घरोघरी व मंडळांनी होळीचे दहन केले. होळीभोवती शंखनाद करीत पाच प्रदक्षिणा घातल्या. अग्नीला स्मरत जीवनाला नवा आकार येऊ दे.. अशी प्रार्थना केली. होळीला पुरणपोळी, श्रीफळ अर्पण केले. काही मंडळांनी पारंपारिकता जपत टिपक्यां वाजवित भागातील लोकांकडून शेणी, लाकडे दान स्वरूपात स्वीकारली.
मंगळवारी सकाळपासून होळीची लगबग सुरू झाली. कार्यकर्ते होळीसाठी एरंडाच्या फांद्यांची शोधाशोध करीत होते. दुपारनंतर गल्लीबोळातील घराघरांसमोर होळीला प्रारंभ झाला. एरंडाच्या फांदीला लागून लाकूड,शेणींनी रचलेल्या होळीभोवती रांगोळ्या घातल्या. फुले, फुग्याने होळीला सजवले. नैवेद्य म्हणून पुरणपोळ्या होळी वर ठेवल्या. ज्येष्ठांच्या हस्ते होळी पूजन झाल्यानंतर अबाल – वृद्धांनी सामूहिकपणे पेटत्या होळीभोवती प्रदक्षिणा घालत शंखनाद केला.
सायंकाळ नंतर मंडळाच्या होळ्या चौकांचौकात विधीवत पेटवल्या गेल्या. अनेक मंडळांनी पर्यावरण संवर्धन साधत होळी लहान करण्याची सजगता दाखवली. त्यांनी परंपरेनुसार होळी लहान करून पर्यावरणाचा समतोल राखला होता.
मंगळवारी आणि बुधवारी होळी व धूलीवंदनाचे पारंपरिक सण आले आहेत. हिंदू दिनदर्शिकानुसार होळी हा पवित्र सण फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो.
यावेळी होळी दहन ३ मार्च तर ४ मार्च रोजी धुलीवंदन पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. होली का दहनाचा शुभ मुहूर्त सायंकाळी ५ वाजून ५५ मिनिटानंतर आल्याने अनेक घरोघरी दुपारी होळी साजरी केली नाही मात्र सहा वाजल्यानंतर घरोघरी व चौका चौकात मंडळांच्यावतीने होळीचे दहन करण्यात आले. यावेळी सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरले होते.
कुरुंदवाड शहरात मोरया गणेशोत्सव मंडळाच्या वतीने महिलांनी होळी साजरी केली यावेळी नूतन नलवडे, सुवर्णा सुतार, मीना माळी, शकुंतला जुगळे, कांचन मेंगे, वंदना पोतदार, सारिका मोरे, सारिका मेंगे, रूपाली चौगुले, पुष्पा पाटील, सुवर्णा सावंत, शुभांगी साळुंखे, विद्या घोरपडे, स्नेहल जुगळे, प्रेरणा मोरे, काव्या माळी, यासह उदय साळुंखे सुधीर माळी अनिल पाटील दीपक चौगुले नील निटवे महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











